उन्नाव : उन्नाव बलात्कारातील पिडीतेचा शुक्रवारी रात्री दिल्लीताल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यामुळे दिल्लीसह देशभरात संताप व्यक्त होत आहे. पिडीतेचा मृतदेह काल सायंकाळी उन्नावला आणण्य़ात आला असून आज तिच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. गावामध्ये तणावाचे वातावरण असल्याने मोठ्याप्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
पीडितेच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की आरोपी जेलमधून सुटून आल्यानंतर त्यांना सतत धमकी देत होता आणि याआधीही त्याने अनेकदा पीडितेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या पीडितेवर मागील वर्षी बलात्कार झाला होता. दोन आरोपींपैकी एका आरोपीला दहा दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. दरम्यान, पीडितेच्या खटल्याची तारीख रायबरेली कोर्टात गुरुवारी होती. त्यासाठी उन्नावमधून रायबरेलीला जात असताना आरोपींनी पीडितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम, त्याचे वडील रामकिशोर, शुभम, हरिशंकर आणि उमेश बाजपेयी यांना अटक केली आहे.
पिडीतेच्या मृत्यूनंतर शनिवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्तात तिचा मृतदेह दिल्लीहून उन्नावला आणण्यात आला होता. चौतरफा टीका झाल्याने आदित्यनाथांनी दोन मंत्री काल उन्नावला पाठविले होते. प्रशासनाने रात्रीच पिडीतेवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कुटुंबीयांनी विरोध करताच रविवारी सकाळी अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेण्य़ात आला.
प्रकरण अंगाशी येऊ लागताच उत्तर प्रदेश सरकारने दोन मंत्री पाठवत पिडीतेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून पिडीतेच्या कुटुंबाला घर देण्याची घोषणा केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्य़ात येणार असून दोषींना लवकर आणि कठोर शिक्षा केली जाईल असे म्हटले आहे.
मी वाचणार ना? मला मरायचे नाहीय! बलात्कार पिडीतेने भावाला विचारलेले ते शब्द शेवटचे
भाजप नेत्याच्या आरोपी आमदाराला शुभेच्छा
उन्नावमधील आणखी एका बलात्कार प्रकरणात भाजपचा आमदार कुलदीप सेंगर हा आरोपी आहे. तो सध्या तिहार कारागृहात आहे. त्या प्रकरणातील पीडितेलाही असाच त्रास देण्यात आला. तिच्या वडिलांना पोलिसांनी खोट्या आरोपांखाली डांबून ठेवले. तिथेच त्यांचे निधन झाले. ती आपल्या नातेवाईक व वकिलांसह न्यायालयात जात असताना एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. त्यात तिचे दोन नातेवाईक मरण पावले. भाजपचे नेते साक्षी महाराज यांनी कुलदीप सेंगरला आज वाढविदसाच्या शुभेच्छा दिल्या. हेच साक्षी महाराज आज मरण पावलेल्या कुटुंबीयांच्या सांत्वनालाही गेले होते.