दारव्हा (यवतमाळ): दारव्हा पोलिसांनी शनिवारी तालुक्याच्या उमरी इजारा येथील शेतशिवारात धाड घालून आठ जुगाऱ्यांना अटक केली. त्यामध्ये अमरावती येथे कार्यरत एक पोलीस कर्मचारी, येथील शिक्षक व वन कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
आरोपींकडून ३१ हजार रुपये रोख, सहा मोबाईल, चार दुचाकी वाहने, एक चारचाकी वाहन असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींमध्ये अभिनंदन दुलसिंग राठोड (३५) रा. आरंभी ता. दिग्रस, दादाराव श्यामराव पवार (६०) रा. खेड ता. दारव्हा, पांडुरंग भीका राठोड (५०) रा. आरंभी ता. दिग्रस, नरेश तुळशीराम माहुरे (३५) रा. लाखखिंड ता. दारव्हा, शकील बेग येनूरबेग (५०) रा. पळशी ता. दारव्हा, भास्कर गुलाब काटे (४८)रा. लाखखिंड ता. दारव्हा, इंद्रजीत बळीराम राठोड रा. उमरीईजारा व अभिमन्यू बाबाराव आडे (४७) रा. उमरी इजारा ता. दारव्हा जि. यवतमाळ यांचा समावेश आहे. यातील अभिनंदन हा वन कर्मचारी, भास्कर हा शिक्षक तर इंद्रजीत हा पोलीस कर्मचारी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दारव्हा एसडीपीओ उदयसिंह चंदेल, ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अमोल सांगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.