यवतमाळ : शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेला स्वरा फार्म हाऊस तेथील कारनाम्यासाठी नेहमीच चर्चेत असतो. बड्या धेंडांचे चोचले या ठिकाणी पुरविले जातात. त्यामुळे आतापर्यंत पोलीस कारवाईही झाली नाही. शनिवारी मध्यरात्रीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून १९ लाख २३ हजार रुपयांची रोख व १९ जुगाऱ्यांना अटक केली. सोबतच लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.
स्वरा फार्म हाऊस परिसरात बेटींगसह अनेक व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना होती. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. शनिवारी रात्री पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या आदेशाने कारवाईचा निर्णय घेण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पंचांना सोबत घेवून धाड टाकली. यावेळी दोन बंगल्यांमध्ये सुरू असलेल्या जुगार डावातील १९ लाख २३ हजार रुपये रोख जप्त केले. एक लाख ३० हजार रुपयांचे मोबाईल, ६० लाख ७० हजारांच्या आलिशान कार असा ८१ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जुगाऱ्यांमध्ये चंद्रपूर, वणी व यवतमाळ येथील आरोपींचा समावेश आहे.
आकाश ऊर्फ शिवा पृथ्वीराज तिवारी (३१) रा.बाजोरियानगर, रामेश्वर दत्ताजी व्यवहारे (४४) रा.रामकृष्णनगर, दीपक शरदराव धात्रक (३६) रा. बस स्टॅन्ड चाैक यवतमाळ, गब्बर मोतेखान पठाण (४२) रा.रामनगर, सुखदेव दत्तूजी दंदे (३७) रा.गिरिजानगर, यवतमाळ, आशिष शत्रुघ्न मडावी (३३) रा.बेवाडा ता.जि.चंद्रपूर, विनोद कवडू जीवतोडे (४०) रा.चिखलगाव ता.वणी, मोहमद अफजल इसराल अहमद सिद्दीकी (२८) रा.इंदरानगर ता.घुगुस, हाफीज खलिल रहेमान (५२) रा.गुरूनगर वणी, मोवीन मुस्लीम शेख (३०) रा.घुगुस, जगदीश गुरूचरण पाटील (३७) रा.राजुर काॅलरी ता.वणी, सरफाैदीन नन्नेशाह रा.राजुरा, शंकर नानाजी खैरे (२९) रा.महाकाली नगर घुगुस, नीलेश बाबाराव झाडे रा.रामनगर घुगुस, शंकर हनुमंत आत्राम (३४) रा.चुना भट्टी ता.राजुरा, अमित यशवंत पाटील (३२) रा.रामपूर ता.राजुरा, नंदकुमार रामराव खापणे (२९) रा.कोलगाव ता.मारेगाव, राहुल संजय चित्तलवार (२०) रा.घुगुस, निखिल अरविंद कुडमेथे (२०) रा.शिवनगर घुगुस या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच साथरोग अधिनियमाप्रमाणेही शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, सहायक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, जमादार गजानन डोंगरे, विशाल भगत, सुमीत पाळेकर, नीलेश राठोड, उल्हास कुरकुटे, मोहमद भगतवाले यांनी केली.
गब्बर व हाफीजचा जुगार अड्डा
पोलिसांची कारवाई होणार नाही ही हमी मिळाल्याने गब्बर मोतेखान पठाण रा.यवतमाळ व हाफीज खलील रहेमान रा.वणी या दोघांनी स्वरा फार्म हाऊसमधील बंगला भाड्याने घेतला. तेथे गेल्या काही महिन्यांपासून आंतरराज्यीय जुगार अड्डा चालविला जात आहे. तेलंगणासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जुगारी येथे येतात. जुगारासोबतच अय्याशीच्या सर्व सोयीसुविधा येथे मिळत असल्याने जुगाऱ्यांचे हे पसंतीचे ठिकाण आहे.