ठाणे : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी सात लाख १५ हजारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अजय श्रीबस्तक (३५) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली.
कल्याणच्या खडकपाडा सर्कल येथील अजय याच्यासह सलीम चांद सय्यद (४३) आणि मोहमद रजा खान यांच्यासह अन्य एक साथीदार इशाक अन्सारी यांचा समावेश आहे. या चौकडीने फ्लीप ड्रीम इंडिया एलएलपी आणि फ्लीप ड्रीम इंडिया ॲक्वा एलएलपी या दोन कंपन्यांची निर्मिती केली होती. याच कंपनीद्वारे गुंतवणूकदारांना या चौकडीने मत्स्यपालन व्यवसायामध्ये गुंतवणूक करून मोठ्या परताव्याचे प्रलोभन दाखविले. एक लाख रुपये १२ महिन्यांसाठी गुंतवल्यास १८ हजार दरमहा परतावा तसेच मुद्दल देण्याचे आश्वासन दिले होते.
अन्य एका योजनेत दोन लाख दोन वर्षांसाठी गुंतवल्यास चार महिन्यांनंतर ७६ हजार देण्यात येणार होते. असे सहा वेळा चार लाख ५६ हजार परताव्यासह मुद्दल आणि एक लाखाचा बोनस अशी पाच लाख ५६ हजार देणार होते.
तक्रारी दाखल करण्याचे आवाहनया कंपन्यांत असंख्य गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संख्येत आणि फसवणूक करून लाटलेल्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यांनी या योजनेत गुंतवणूक केली असेल त्यांनी ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा.