ठाणे: ऐरोलीचे (नवी मुंबई) भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीनाची सुनावणी आता गुरुवारी होणार आहे. त्यांच्यावर असलेल्या बलात्कारासह रिव्हॉल्व्हरने महिलेला धमकविल्याच्या आरोपाबाबत चौकशीसाठी त्यांना अटकपूर्व जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी ठाणे न्यायालयात केली. त्यावर ठाण्याचे जिल्हा तसेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांनी गुरुवारी सुनावणी करणार असल्याचे सांगितले.
नवी मुंबईच्या नेरुळ पोलिसांनी बलात्कार प्रकरणासाठी नाईक यांची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळेच त्यांच्या पोलीस कोठडीची गरज असल्याचे न्यायालयात सांगितले. तर संबंधित महिलेला रिव्हॉल्व्हरने धमकविल्याप्रकरणी बेलापूर पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाºयांनी रिव्हॉल्व्हर जप्त करायची असल्याने पोलीस कोठडीची मागणी केली. त्यामुळेच कथित आरोपी गणेश नाईक यांना जामीन दिला जाऊ नये, अशी मागणी सरकारी वकील तसेच पिडितेच्या वकीलांनी न्यायालयात केली.याऊलट, दोघांनी संमतीपूर्वक संबंध ठेवले आहेत. त्यामुळे या प्रकाराला बलात्कार मानू नये, असा दावा नाईक यांच्या वकीलांनी केला. यावर २०१० ते २०१७ या काळात या पिडितेवर बलात्कार होत होता, तिच्या मनाविरुद्ध नाईक हे संबंध प्रस्थापित करीत होते. असा दावाही पिडितेच्या वकीलांनी केला.
संमतीपूर्वक संबंध असल्याचे मान्य-
या महिलेशी संमतीपूर्वक संबंध होते. एक मुलगाही आहे. डीएनएसाठीही तयारी असून त्यांची रिव्हॉल्व्हरही जमा करण्याची तयारी असल्याचे नाईक यांच्या वकीलांनी सांगितले.
गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी!
दोन वेळा नातेवाईकांमार्फत संबंधित पिडितेला नाईक यांच्याविरुद्धचा गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी देण्यात आली आहे. त्याची तक्रार वाशी पोलीस ठाण्यात दाखल केल्याचेही पिडितेच्या वकिलांनी न्यायालयात तसेच प्रसारमाध्यमांना सांगितले.