मुंबई - एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपाप्रकरणी भाजपा नेते आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी अधिकाधिक वाढत आहेत. या प्रकरणात नाईक यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज ठाणे येथील कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे नाईक यांचा पाय आणखीनच खोलात गेला असून, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या एका महिलेने त्यांच्याविरोधात बेलापूर आणि नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तब्बल २७ वर्षांनी बलात्काराचा आरोप केला होता. याबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच रिव्हॉल्व्हर दाखवून धमकाविल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातही नाईक यांच्याविरुद्ध याच महिलेने स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. गणेश नाईक यांनी अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवल्याचे या महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. नवी मुंबईतील नेरूळ पोलिसांनी या प्रकऱणात तपास करण्यास सुरुवात केली असून, या महिलेची वैद्यकीय चाचणी केली होती.
दरम्यान गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. सुरुवातीला जिल्हा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी या अर्जावर सुनावणीला नकार दिला. त्यानंतर हे प्रकरण न्या. गुप्ता यांच्या न्यायालयात आले. या न्यायालयानेही केवळ रिव्हॉल्व्हरने धमकी दिल्याप्रकरणी सुनावणी केली. सरकारी वकील आणि तपास अधिकारी यांचा जबाब नोंदविल्यावर पुढील निर्णय दिला जाईल. मात्र, त्यांना अंतरिम जामीन दिला नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. दरम्यान, या प्रकरणात आज अखेरीस न्यायालयाने आज त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.