वास्को - १५ वर्षीय शाळकरी मुलीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात गुंतवलेल्या प्रकरणात वास्को पोलीसांनी चार जणांना अटक केली असून यात दोन महिला तर दोन तरुणांचा समावेश आहे. त्या मुलीवर सहा महिन्यापासून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार होत असून १५ दिवसांपूर्वी विद्यालयातील शिक्षकांना तिच्या हावभावात तसेच प्रकृतीत बदल आल्याचे दिसून आल्यानंतर याबाबत पोलीसांना माहिती दिल्यानंतर पोलीसांनी त्या मुलाला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात गुंतवलेल्या प्रकरणाचा छडा लावून चारही संशयितांना गजाआड केले.
मुरगाव पोलीस स्थानकाच्या उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ वर्षीय शळकरी मुलीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात गुंतवलेल्या प्रकरणात गुरूवारी (दि. १७) उशिरा रात्री चार संशयितांना अटक करण्यात आल्याची माहीती दिली. अटक करण्यात आलेल्यात १९ वर्षीय शिल्पा राथोड (वय १९, रा: वाडे) तिची आई लक्षीमी राथोड (वय ३८, रा: वाडे) याबरोबरच इस्माईल शेख उर्फ कब्बू (वय ३०, रा: बायणा - वास्को) व परशुराम पाटकर उर्फ पटरी (वय २६, रा: आसयडोंगरी - दाबोळी) यांचा समावेश असल्याची माहीती दिली. मुरगाव तालुक्यातील एका विद्यालयात शिकरणारी १५ वर्षीय मुलगी शाळेत योग्यरित्या येत नसल्याबरोबरच तिच्या हावभावात बराच बदल झाल्याचे विद्यालयातील शिक्षिका तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. तसेच तिची प्रकृती ठिक नसल्याचे जाणवल्यानंतर यामागचे कारण शोधून काढण्यासाठी विद्यालयाने प्रयत्न सुरू केले. यासाठी विद्यालयाने समुपदेशक नेमून तिच्या वागणूकीत झालेल्या बदलाबाबत माहिती काढून घेण्याचे प्रयत्न सुरू केल्यानंतर तिच्यावर मागच्या काही काळापासून अत्याचार होत असल्याचे सामोरे आले. सदर प्रकार उघडकीस येताच पोलीसांना विद्यालयातर्फे याबाबतची माहीती दिल्यानंतर पोलीसांनी सदर प्रकरणात कारवाई करण्यास सुरवात केल्याचे उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी सांगितले. पोलीसांनी मुलीशी चौकशी करण्यास सुरवात केल्यानंतर तिच्याबरोबर काही चुकीचे घडले आहे हे स्पष्ट झाले, मात्र मुलगी सुरवातीला घाबरलेली असल्याने याबाबत जास्त माहिती पोलीसांना मिळाली नसल्याचे सावंत यांनी सांगितले. पोलीसांकडून मुलीचा विश्वास जिंकण्यात आल्यानंतर तिने तिच्याबरोबर घडलेला प्रसंग पोलीसांसमोर उघड केल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी देऊन यातून तिला वेश्या व्यवसायात जबरदस्तीने गुंतवण्यात आल्याचे स्पष्ट होण्याबरोबरच तिच्यावर काही वेळा बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहीती दिली. विद्यालयातून घरी जाण्यासाठी सदर अल्पवयीन मुलगी खासगी बसमधून प्रवास करायची अशी माहीती चौकशीच्या वेळी स्पष्ट झाल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. सुमारे सहा महिन्यापूर्वी बसमधून प्रवास करताना ह्या मुलीची अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय संशयित शिल्पा हीच्याशी ओळख होऊन नंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर संशयित शिल्पा काही वेळा त्या अल्पवयीन मुलीच्या घरी राहण्यासाठी गेली असल्याचे तपासणीत उघड झाले असून यामुळे दोघांच्या मैत्री आणखीन वाढली. यानंतर ती अल्पवयीन मुलगी काही महिन्यापूर्वी संशयित शिल्पा हिच्या घरात पहील्यांदा राहण्यासाठी गेली असता येथे तिला जेवण तसेच मद्यपान (बियर) देण्यात आल्याचे तपासात उघड झाले. यानंतर काही दिवसात शिल्पाने त्या मुलीला आपल्या घरात राहण्यासाठी पुन्हा बोलवल्यानंतर तिला पुन्हा जेवणाबरोबर दारू पाजण्यात आल्याचे पोलीसांना त्या मुलीशी चौकशी करताना जाणविले. त्या मुलाला नशा झाल्यानंतर त्यांनी येथे एका पुरूषाला बोलवून जबरदस्तीने तिला पहील्यांदा वेश्या व्यवसायात गुंतवल्याचे पोलीसांना तपासणीत जाणवले. दुसऱ्या दिवशी आपल्यावर काय प्रसंग आला होता याची जाणीव त्या मुलाला झाली, मात्र तिला भिती दाखवून काही पैसे देऊन याबाबत गप्प राहण्यास बजावण्यात आले. तसेच यानंतर अन्य काही वेळा अशाच प्रकारे त्या मुलीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याचे प्रसंग घडल्याची माहीती पोलीसांसमोर उघड झाली. अटक करण्यात आलेल्या शिल्पा हिची आई लक्ष्मी वेश्या व्यवसायासाठी ग्राहक आणायची अशी माहिती तपासणीत पोलीसांसमोर स्पष्ट झाली आहे. त्या मुलीवर अत्याचार चालूच राहिल्याने तिच्या प्रकृतीत बिघाड होऊन तिला उपचाराकरीता रुग्णालयात सुद्धा दाखल करण्याची पाळी आली अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सावंत यांनी दिली. उपचार घेऊन ती मुलगी ठिक झाल्यानंतर शाळेत जात असताना पहील्यांदा तिला दोन तरुणांनी अडवून तिला धमकी देत पुन्हा वेश्या व्यवसायात येण्यासाठी धमकी दिली. धमकी दिली असली तरी तिने यास विरोध केल्याचे लक्षात येताच नंतर दुसऱ्यांदा मुखवटा घालून तीन अज्ञात व्यक्ती त्या मुलीच्या घरात घुसून तिला धमकी दिली असल्याचे पोलीसांना तपासणीत जाणविले.सदर मुलीवर घडलेल्या अत्याचाराच्या ह्या संपूर्ण घटनेची माहीती सुमारे १५ दिवसापूर्वी वास्को पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी सदर मुलीला वेश्या व्यवसायात गुंतवलेल्या आरोपींना गजाआड करण्यासाठी सापळा रचला. यानुसार गुरूवारी (दि १७) उशिरा रात्री वास्को पोलीसांनी १९ वर्षीय शिल्पा, तिची आई लक्ष्मी यांना गजाआड करण्याबरोबरच त्या अल्पवयीन मुलीला पुन्हा वेश्या व्यवसायात जाण्यासाठी धमकी देणारे संशयित इस्माईल शेख उर्फ कब्बू व परशुराम पाटकर उर्फ पटरी यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनाता सावंत यांनी दिली. सदर १५ वर्षीय मुलीला वेश्या व्यवसायात जबरदस्तीने गुंतवलेल्या अटक करण्यात आलेल्या ह्या टोळीकडून अन्य काही जणांना अशाच प्रकारे वैश्या व्यवसायात गुतवले असावे असा संशय पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत असून यामार्गाने सुद्धा सध्या पोलीस तपास करीत आहेत. वास्को पोलीसांनी सदर प्रकरण भा. दं. वि. कलम ३७०, ३७६, ५०६(२) आरडब्ल्यु ३४ कलम याबरोबरच गोवा बाल कायद्याच्या, पॉक्सो कायद्याच्या व अनैतिक व्यपार निवारण अधिनियमाच्या कायद्याखाली ह्या संशयिताच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सुनाता सावंत यांनी दिली. दरम्यान शुक्रवारी (दि. १८) संध्याकाळी सदर प्रकरणातील चारही संशयितांना वास्कोच्या प्रथम श्रेणी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधीक्षाने बजाविला. सदर प्रकरणाचा वास्को पोलीस अधिक तपास करीत आहेत.