पुणे : हडपसरमधील मगरपट्टा येथील सराफ दुकानावर दरोडा टाकण्यासाठी जमलेल्या विशाल सातपुते टोळीतील ७ जणांना गुन्हे शाखेच्या युनिट ३च्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून १२ बोरची रायफल, देशी रिव्हॉल्व्हर, ६ काडतुसे, दोन कोयते, फॉर्च्युनर ही महागडी कार व दुचाकी असा १४ लाख ७४ हजार ८४० रुपयांचा माल जप्त केला आहे. पुण्यात बर्याच वर्षानंतर गुन्हेगारी टोळीकडून १२ बोरची रायफल जप्त केली गेली आहे़ विशाल उर्फ जंगल्या श्याम सातपुते (वय ३० रा.पीएमसी कॉलनी, घोरपडी पेठ), राजू शिरीष शिवशरण (वय २८, रा़ ठोंबरे वस्ती), पंकज सदाशिव गायकवाड (वय ३५, रा़ कोलवडी, ता़ हवेली), आकाश राजेंद्र सकपाळ (वय २६, रा. रविराज टेरेस, सुखसागर नगर), गणेश मारुती कुंजीर (वय २७, रा. कुंजीरवस्ती, थेऊर), रामेश्वर बाळासाहेब काजळे (वय ३३, रा. वडगाव शेरी), ऋषिकेश राजेंद्र पवार (वय १९, रा़ कोलवडी, ता़ हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.विशाल सातपुते याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडाच्या तयारी असे ६ गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या गुन्ह्यात सध्या तो पॅरोलवर सुटला होता. त्याच्याप्रमाणेच त्याच्या साथीदारांवर अनेक गुन्हे दाखल असून ते सध्या पॅरोलवर सुटले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट ३ मधील पोलीस नाईक अतुल साठे, हवालदार संतोष क्षीरसागर, सहायक फौजदार किशोर शिंदे यांना विशाल सातपुते हा साथीदारांसह मगरपट्टा येथील एका फ्लॅटवर थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट ३ चे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उपनिरीक्षक किरण अडागळे व त्यांच्या सहकार्यांनी मगरपट्टा सिटी येथील फ्लॅटवर छापा घालून विशाल सातपुतेसह ७ जणांना पकडले. त्यांच्याकडून रायफलसह घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध दरोड्याच्या तयारीसह साथ रोग प्रतिबंधक अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनामुळे सुटले अन पुन्हा गुन्ह्याच्या तयारीत कोरोनाचा विळखा कारागृहात वाढू नये, म्हणून राज्यभरात हजारो गुन्हेगारांना पॅरोलवर सोडण्यात आले. त्याचाच फायदा घेऊन खुन, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गुन्हे असलेले विशाल सातपुते व त्याचे साथीदार पॅरोलवर बाहेर आले होते. त्यानंतर ते पुन्हा गुन्हा करण्याच्या तयारीत जमले होते. मगरपट्टा येथील एका प्रसिद्ध सराफ दुकानावर दरोडा टाकण्याचा त्यांनी कट रचला होता. परंतु, त्यापूर्वीच कुणकुण लागल्याने पोलिसांनी त्यांना पकडले.