पुणे : आंबेगाव पठार येथे एकावर हत्याराने वार करुन त्याचा खुन करणाऱ्या पाच आरोपींना ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींकडून तीन लोखंडी कोयते, मिरची पूड, दोरी व दोन मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. करण सुरेश शिंदे (वय 23), मितेश सुरेश शिंदे (वय 29, दोघेही रा. जैन मंदिर, कात्रज), विशाल मोहन बोराने (वय 25, रा.बर्वे. ता.भोर), अमित सुनील भोरडे (वय 21, रा.दत्तनगर, शिवांजली बिल्डींग, कात्रज) आणि शंभुराजे जालिंदर कोंडे (वय 21, रा.बर्वे, भोर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडीच्या दिवशी आंबेगाव पठार येथे एकावर खुनी करुन फरार झालेले आरोपी हे कात्रज घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना लुबाडण्याकरिता लपून बसल्याची माहिती भारती पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस निरीक्षक सुबराव लाड व त्यांच्या सहका-यांना गस्त घालताना मिळाली. त्यांनी ती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांना कळवली. त्यांनी सहाका-यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि आरोपींना पकडण्याकरिता सापळा रचला. पोलिसांना निसर्ग हॉटेलपुढील रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या दाट झाडीत लपून बसलेले आरोपी वाहनांच्या दिव्याच्या उजेडात दिसले. यावेळी दरोड्याच्या तयारीतील पाच आरोपींना धारदार हत्यारासह पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कात्रज घाटातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना लुटण्याकरिता थांबल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण 55 हजार 710 रुपये किंमतीच्या वस्तु जप्त करण्यात आले. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णु ताम्हाणे, तसेच पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, सचिन पवार, राहुल तांबे यांनी केली. आरोपींची सखोल तपासणी केली असता त्यांनी दहीहंडीच्या दिवशी अशोक मारुती भुरुक (रा.साईप्रसाद सोसायटी, शिवसाई बिल्डींग, आंबेगाव पठार) नावाच्या व्यक्तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लाड हे करीत आहेत.
आंबेगाव पठार येथे एकावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी हत्यारासह जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 4:04 PM
दहीहंडीच्या दिवशी व्यक्तीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे सांगितले.
ठळक मुद्देकात्रज घाटातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना लुटण्याकरिता थांबल्याची आरोपींची कबुली