संजय सोनार, चाळीसगाव (जि. जळगाव): अघोरी पूजा करून गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या नऊ जणांच्या टोळीस चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली. नागद रोडवरील पेट्रोल पंपासमोरील एका शेतात शनिवारी रात्री ही धडक कारवाई करण्यात आली.
लक्ष्मण शामराव जाधव (४५, रा. चाळीसगाव), शेख सलीम कुतुबुद्दीन शेख (५६, चाळीसगाव), अरुण कृष्णा जाधव (४२, रा. आसरबारी ता.पेठ), विजय चिंतामण बागूल (३२, रा. नाशिक), राहुल गोपाल याज्ञिक (२६, रा. ननाशी, ता.दिंडोरी), अंकुश तुळशीदास गवळी (२१, रा. जोरपाडा, ता. दिंडोरी), संतोष नामदेव वाघचौरे (४२, रा. नाशिक), कमलाकर नामदेव उशिरे (४७, रा. गणेशपूर, ता.चाळीसगाव) आणि संतोष अर्जुन बाविस्कर (३८, रा. अंतुर्ली, ता.एरंडोल), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोकॉ पवन पाटील व ज्ञानेश्वर पाटोळे यांना मिळालेल्या माहितीवरून ही धडक कारवाई करण्यात आली. नागद रोडवरील पेट्रोलपंपासमोर शेतातील पडीक घरात शनिवारी रात्री गुप्तधनासाठी काही जण अघोरी पूजा व जादूटोणा करीत असताना आढळून आले. पोलिसांनी लागलीच छापा टाकून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून अघोरी पूजेचे, तसेच मोबाइल व चारचाकी वाहनासह आठ लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.