मीरारोड - मध्ये प्रदेश येथून गाडी घेऊन महाराष्ट्रात येणाऱ्या आणि लग्नसमारंभात चोऱ्या करून पळून जाणाऱ्या आंतरराज्य टोळीला काशीमीरा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांनी काशीमीरा सह इगतपुरी, मुंबई भागात आठवड्याभरात ८ लग्न समारंभात चोऱ्या केल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी शुक्रवारी सायंकाळी दिली.
काशीमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्या भरात ३ लग्न समारंभात चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या . यामुळे खळबळ उडाली होती . पोलिसांच्या हाती जीसीसी क्लब मधील सीसीटीव्ही फुटेज हाती लागले होते. परिमंडळ १ चे उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विलास सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक जावेद मुल्ला सह पी. जी. कावरे, विश्वनाथ जरग, हनुमंत तेरवे, समीर यादव, सुधीर खोत, अनिल नागरे, सनी सुर्यवंशी यांची पथके तपास करू लागली .
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जीसीसी क्लब जवळून ६ डिसेंबर रोजी बाबु लखपत सिसोदीया (२१) सोबत एका ८ वर्षाच्या मुलास ताब्यात घेतले होते . त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांच्या आणखी तिघा साथीदारांचा पोलिस शोध घेत होते . सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरीसाठी वापरत असलेल्या मध्यप्रदेशचा क्रमांक असलेली गाडी तसेच तांत्रिक विश्लेषणा वरून त्यांचा मागोवा घेण्यास सुरवात केली .
पोलीस बांगूरनगर पोलीस ठाण्या पर्यंत पोहचले असता त्यावेळी आरोपी इगतपुरी भागात होते व नंतर ते पुन्हा मुंबईत आले . काशीमीरा नाका येथील बार जवळ त्यांची गाडी उभी असल्याने पोलिसांनी सापळा रचून गुरुवार ९ डिसेंबर रोजी आतीश अमर सिसोदीया, (२३) ; निखील रवी सिसोदीया (१९) आणि करण महवीर सिंग (२३) रा . मु. पो. पडकोली, जिल्हा आग्रा, उत्तरप्रदेश. ह्या तिघांना अटक केली . यातील करण सिंग सोडून बाकी सर्व चारही आरोपी हे मध्य प्रदेशच्या राजगढ जिल्ह्यातील कढीया गावचे आहेत .
२९ नोव्हेंबर रोजी हे सर्व आरोपी लग्न समारंभ साधून चोऱ्या करण्यासाठी महाराष्ट्रात मोटारकारने आले होते . आठवड्या भरात त्यांनी काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत ३० नोव्हेम्बर रोजी २ तर ५ डिसेम्बर रोजी १ चोरी केली होती . तर मुंबईच्या बांगूर नगर, सहार व सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तसेच नाशिकच्या इगतपुरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी ठिकाणी चोरी केली असल्याचे आता पर्यंत उघडकीस आले आहे . पोलिसांनी आरोपीं कडून गुन्ह्यात वापरत असलेल्या मोटारकार सह चोरीस गेलेले ३०० ग्रॅम वजनाचे सोन्या - चांदीचे दागिने, ६ मोबाईल फोन व ५० हजार रोख असा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे . आरोपीना ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे . त्यांनी आणखी चोऱ्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे .