बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 11:30 AM2024-10-14T11:30:22+5:302024-10-14T11:31:11+5:30
बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे
मध्य प्रदेशात बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी भोपाळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आरोपी फक्त बनावट नोटा बनवत नव्हेत तर त्यांनी बनावट नोटा बनवण्याचं आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली होती.
राजकुमार महरा नावाच्या व्यक्तीने भोपाळ येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यात त्याने म्हटलं होतं की, १५ दिवसांपूर्वी उस्मानने त्याला सांगितलं की, बनावट नोटा बनवणारे काही लोक आहेत आणि त्या नोटा हुबेहुब मूळ नोटासारख्या दिसतात. या नोटा काचेच्या प्लेट आणि केमिकलच्या मदतीने तयार केल्या जातात. केमिकल कलर शाईची किंमत ७ लाख रुपये असून त्यातून २० लाख रुपयांच्या नोटा तयार केल्या जातात.
राजकुमारने सांगितलं की, "उस्मानच्या बोलण्यात मी अडकलो आणि त्याच्यासोबत एका माणसाच्या फ्लॅटवर गेलो. यानंतर आणखी तीन जण तेथे आले. त्यांनी पिशवीतून शाई, पांढरा कागद आणि इतर वस्तू काढल्या. त्यानंतर नोट्स तयार करण्यात आल्या. यानंतर उस्मानने ही नोट राजकुमारला दिली आणि कोणत्याही दुकानात जाऊन बघ असं सांगितलं. बाहेर आल्यानंतर मी या नोटांचा वापर करून ३०० रुपयांचं पेट्रोल भरलं आणि उर्वरित ६०० रुपयांची फळं आणि किराणा सामान खरेदी केलं. यानंतर मी फ्लॅटवर आलो."
"जेव्हा मी फ्लॅटवर पोहोचलो तेव्हा तिघांनी माझ्याकडे २६०००० रुपयांची मागणी केली. कागद आणावा लागेल असं सांगितलं. मी त्यांना पैसे दिले. मी दोन दिवसांनी फ्लॅटवर पोहोचलो तेव्हा या लोकांनी शाई चुकून पडल्याचं सांगितलं. याशिवाय नोटा बनवता येत नाहीत. त्यानंतर या लोकांनी मला ७ लाख रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितलं. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, असं मी सांगितल्यावर हे लोक म्हणाले, चार लाखांची व्यवस्था कर, उरलेले ३ लाख रुपये कर्ज घेऊ. यानंतर मी माझ्याकडचे तीन लाख रुपये दिले."
"या लोकांनी सांगितलं की शाई चार दिवसांनी येईल. पैसे देऊन दहा दिवस उलटून गेले, पण आजपर्यंत कोणीही आलं नाही." राजकुमारच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. आरोपींना पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि बनावट नोटा तयार करून ते फसवणूक कशी करायची हे सांगितलं. गुन्हे शाखेने आरोपींकडून बनावट नोटा बनवण्याचं साहित्य जप्त केलं आहे.