- नरेश डोंगरेनागपूर : अल्पवयीन असले तरी त्यांची एक टोळी आहे. त्यांच्यातील काही दारू, गांजा, हिरोईन, एमडी अशा सर्वच व्यसनात बुडाले आहेत. व्यसन पूर्तीसाठी ते चाकू, तलवारी, गुप्ती घेऊन कुणावरही हल्ला करतात. कुणालाही लुटतात. सिनेमातील प्रसंगासारखे वर्दळीच्या भागात हैदोस घालतात. खंडणी वसुलीही होते. त्यांचे हे सर्व बिनबोभाट सुरू आहे. ते कुणाला घाबरत नाही. त्यांना वठणीवर आणण्याचा एक प्रयत्न झाला अन हा अडचणीचा मुद्दा उपस्थित झाल्याने पोलीसच दडपणात आले. होय, सर्वत्र चर्चेचे रान पेटविणाऱ्या धिंड प्रकरणाने सध्या नागपूर पोलिसांवर चांगलेच दडपण आले आहे. प्रकरण जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बुधवारी रात्री बियर बार मध्ये अचानक चाकू, तलवार, गुप्ती असे घातक शस्त्र घेऊन सहा गुंड शिरले. त्यांनी नंग्या तलवारी दाखवून ग्राहकांना, बार व्यवस्थापकाला धमकावले. बारच्या गल्ल्यासोबत दारूच्या बाटल्या लूटल्या. काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर घातक शस्त्र उगारले. सुदैवाने शस्त्र कुणाला लागले नाही. अवघ्या पाच मिनिटात बार लुटून आरोपी फरार झाले. ते नाराकडे गेले. तेथे यथेच्छ दारू प्यायले आणि मनसोक्त जेवून पुन्हा नव्या गुन्ह्याच्या तयारीत लागले. दरम्यान, भर वस्तीतील बार सिनेस्टाईल लुटला गेल्यामुळे पोलिसांची विविध पथके रात्रभर आरोपींचा शोध घेऊ लागले. गुरुवारी पहाटेच्या वेळी आरोपी पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी त्यांना आहे त्या अर्धनग्न अवस्थेत बाजारपेठ दाखवली. काही तासांपूर्वी नागरिकांना शस्त्र दाखवून, दहशत पसरविणार्या गुंडांची नशा उतरली होती. गुंडांची ही (धिंड) अवस्था सर्वसामान्य नागरिकांना आश्वसतच नव्हे आनंदित करणारी होती. मात्र गुंडाच्या पाठिराख्यांनी त्यांच्या वयाचे अस्त्र पोलिसांवर उगारण्याचे प्रयत्न चालविले आहे. या पार्श्वभूमीवर, अल्पवयीन मुलांची धिंड काढण्याचा कांगावा करून पोलिसांवर प्रकरण उलटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे, बार लुटणारे अल्पवयीन असले तरी त्यांचा यापूर्वीचाही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. खापरखेडा, यशोधरानगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आधीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना सुधारगृहात पाठवले होते. त्यांच्या वर्तनात सुधारणा व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. मात्र दोन आठवड्यांपूर्वीच ते सुधारगृहातून बाहेर आले आणि पुन्हा गुन्हे करू लागले. गुरुवारी सकाळी पोलिसांनी त्यांची वरात काढल्यानंतर काही जणांनी पडद्याआडून पोलिसांवर मानवाधिकार नामक अस्त्र उगारून त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न चालविले आहे.
वय लहान, गुन्हे मोठमोठेनागपुरात बालगुन्हेगारांची संख्या मोठी आहे. प्रत्येक दहाव्या गुन्ह्यात एक ना एक अल्पवयीन आरोपी असतोच. गेल्या आठवड्यात अवघ्या सोळा वर्षाच्या एका आरोपीने धडधाकट निरपराध तरुणाची गळाकापून हत्या केली. मृत तरूण रोजगाराच्या शोधात आपले कुटुंब सोडून बिहार मधून नागपुरात आला होता. येथे मिळेल ते काम करून आपला खर्च भागवित होता. तो त्यांच्या कुटुंबीयांनाही मदत पाठवीत होता. टाइगर नामक हा तरुण काम आटोपून रात्रीच्या वेळी घराकडे जात असताना व्यसनाधीन १६ वर्षीय आरोपीने त्याला शंभर रुपये मागितले आणि दिले नाही म्हणून त्याच्या गळ्यावर कैचीचे घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली. नागपुरात हे पहिले प्रकरण नाही. अपहरण, बलात्कार, दरोडे, खून, खुनाचे प्रयत्न, हाणामाऱ्या अशा गंभीर गुन्ह्यात गेल्यावर्षी २०० पेक्षा जास्त अल्पवयीन आरोपीचा समावेश होता, हे येथे विशेष!हे भयावह वास्तव डोळ्यासमोर असताना ते १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहे म्हणून त्यांना गुन्हेगारी करण्यासाठी मोकाट सोडणे योग्य नाही. अमानुषपणे कुणाच्याही जानमालाला धोका पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना आणि त्यांची पाठराखण करणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा. तेथे वय किंवा कुणीच आडवे येऊ नये. हे करताना कुणी दडपण आणू पाहत असेल तर त्यांनाही रेकॉर्डवर घ्यावे. कायद्याचा बडगा उगारण्याची मुभा असलेले पोलिसच धास्तीत येत असेल तर गुन्हेगारांना वठणीवर कोण आणतील?