ठाणे : दरोडे टाकून खंडणीही उकळणाऱ्या अभिषेक सिंग (२३, ईश्वरनगर, नवी मुंबई) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी तसेच दोन हजारांची रोकडही हस्तगत केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
कळव्यातील वाघोबानगर येथील रहिवासी चंद्रभान प्रजापती आणि त्यांचे मित्र किशनकुमार राणा हे दोघे वाघोबानगर येथील रस्त्याने ४ डिसेंबर २०१९ रोजी पायी जात होते. त्यावेळी चार जणांच्या एका टोळक्याने या दोघांनाही दगडाने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल आणि रोकड असा ३५ हजारांचा ऐवज जबरीने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अभिषेक यांच्यासह भरत जाधव (२५, रा. नवी मुंबई), आशुतोष पाटोळे (१९, रा. नवी मुंबई), परमेश्वर पाटोळे (१९, रा. नवी मुंबई) आणि अभिषेक आंबावकर (१९, रा. नवी मुंबई) या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांनी जबरीने चोरलेली सोनसाखळी आणि दोन हजारांची रोकडही हस्तगत केली. त्यांनी ४ डिसेंबर रोजी नवी मुंबईतील दिघा येथेही सुनीलकुमार दुबे यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. ती न दिल्याने त्यांना मारहाण करून ठार मारण्याचीही धमकी दिल्याचे चौकशीत उघड झाले.