डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उतरणारे अनेक प्रवासी रेल्वे पटरी मार्गाला लागून असलेल्या म्हसोबानगर झोपडपट्टीतून समांतर रोड आणि ९० फिट रस्त्याच्या दिशेने ये-जा करीत असतात. या प्रवाशांना लुटण्यासाठी आलेल्या सात जणांच्या टोळीला प्राणघातक शस्त्रांसह रामनगर पोलिसांनी रविवारी रात्री १०.३० वाजता अटक केली. सात आरोपींपैकी दोघेजण अल्पवयीन आहेत.
सागर उर्फ मुन्ना शंभु शर्मा (वय १९), जेम्स गांधी सुसे (वय २४), सत्यकुमार मुकेश कनोजिया (वय १९), सचिन ऊर्फपिल्लु उमाशंकर राजभर (वय २१), सोनु मदन कनोजिया (वय १९), या पाच जणांसह टोळीत अन्य दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
रामनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, शंकर निवळे आणि त्यांचे अन्य सहकारी रात्रीच्या गस्तीसाठी ठाकुर्ली परिसरातील चोळेगाव, म्हसोबा चौक, रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फिट रोडवर गस्त घातल होते. त्यावेळी म्हसोबा चौकातील आडोशाला अंधारात तरुणांचे एक टोळके उभे असल्याचे दिसले.
पोलिसांनी त्यांच्या दिशेने जाऊन चौकशी केली असता, ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पोलिसांनी त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या जवळ दरोडा टाकण्यासाठी लागणारी घातक शस्त्रे आढळून आली. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून पटरीलगत असलेल्या म्हसोबानगर झोपडपट्टीच्या गल्लीतून कल्याण डोंबिवली समांतर रस्ता आणि ९० फूट रोडकडे पायी जाणाऱ्या प्रवाशांना लुटणे आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेत दरोडा टाकण्याच्या निमित्ताने हे सात जण एकत्र आले होते. असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. हे सर्वजण ठाकुर्ली चोळेगाव, म्हसोबानगर, डोंबिवली खंबाळपाडा, शेलारनाका त्रिमुर्तीनगर झोपडपट्टीमधील राहणारे आहेत.