लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग कंपनीच्या माध्यमातून खोटे पत्ते देऊन कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायाने बुकिंग केलेली पार्सल घेताना बिलापेक्षा कमी रक्कम मोजण्यासाठी देऊन पार्सलमधील किमती वस्तूंचा परस्पर अपहार करणाऱ्या नगऱ्या उर्फ किरण अमृत बनसोडे (२५, रा. मलंगगडरोड, कल्याण) याच्यासह तिघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून लॅपटॉपसह ९३ हजार ३९९ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ई-कार्ट लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड कंपनीचा डिलेव्हरी बॉय फ्लिपकार्ट कंपनीकडून ऑर्डर केलेली ४४ हजार ९०० रुपयांची घड्याळे घेऊन घोडबंदर रोड येथील एका रहिवाशाकडे ३० डिसेंबर रोजी सकाळी ९.२० वाजण्याच्या सुमारास गेला होता. तेव्हा शिपमेंटच्या वस्तूंपेक्षा कमी पैसे असल्याचा बहाणा करून, त्यांना पैसे मोजण्यामध्ये गुंतवून डिलिव्हरीचे पार्सल या कर्मचाऱ्याने दूर नेले. नंतर त्यातील ४४ हजारांचे नामांकित कंपनीचे घड्याळ काढून घेतले. त्याऐवजी साबणाच्या वड्या दिल्या. याबाबत ब्रह्मांड येथील ई-कार्ट लॉजिस्टिकचे कर्मचारी अविनाश वाकळे (२७, ठाणे ) यांनी ३१ डिसेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन सरडे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ऑनलाइन पार्सल मागवून डिलिव्हरीबॉयची फसवणूक करणाऱ्या बनसोडेसह दीपक चौधरी उर्फ अतुल वर्मा उर्फ मनजित सिंग (२२, रा. डोंबिवली) आणि रॉबिन ॲन्थोनी अरुजा (२६, डोंबिवली) या तिघांना १ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाइल फोनसह फवणुकीतील ४४ हजार ९०० चे घड्याळ, दोन मोबाइल आणि लॅपटॉप असा ऐवज हस्तगत केला.
अनेक ठिकाणी फसवणूकहे तिघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांनी यापूर्वी डोंबिवली, ठाणे मुंबई, नवी मुंबई, अलिबाग, सातारा, गणपती पुळे, केरळ, गुजरात, विशाखापटणम, मध्य प्रदेश या ठिकाणी अशाप्रकारे फसवणुकीचे प्रकार केल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दोन काेटींचा ऐवज वाचलाया ठकसेनांनी अशाप्रकारे आणखी सहा महागड्या मोबाइलच्या ऑर्डर कासारवडवली आणि हिरानंदानी परिसरामध्ये दिल्या होत्या. त्यांच्या अटकेमुळे पुढील गुन्हे त्यांना करता आले नाही. त्यामुळे कंपनीचे सुमारे दोन कोटी सात लाख ३९६ रुपयांचे नुकसान वाचविण्यात यश आले आहे.