ठाणे : डोंबिवलीच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही. हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅकवर) चालविण्यात येणार असल्याची माहिती ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
ठाण्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना शिंदे यांनी ही माहिती दिली. डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटना निंदनीय असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, आतापर्यंत या घटनेतील ३३ आरोपींची नावे समोर आली असून, त्यातील २७ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी कितीही मोठा असला किंवा तो कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्याचा नातेवाईक असला तरी त्याची गय केली जाणार नाही. संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना दिले आहेत.
अशा घटना पुन्हा होणार नाही, अशी कायद्याची जरब राहील, अशी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.
मुख्यमंत्री निधीतून २० लाख द्यावेत- आठवलेकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली. यावेळी तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणी मुलीला मुख्यमंत्री फंडातून २० लाखाची मदत द्यावी अशी मागणी केली. रिपब्लिकन पक्षातर्फे दोन लाख रुपयांची मदत मुलीच्या कुटुंबीयांना देणार असल्याचे आठवले यांनी सांगत या घटनेचा निषेध केला आहे.