डोंबिवली: सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार अल्पवयीन आरोपींची भिवंडी बाल न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. परंतू या निर्णयाला पिडीताने आव्हान दिले आहे. जामिन अर्ज रद्द करण्याची मागणी तीने ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. त्याबाबत आज न्यायालयात सुनावणी होऊन निर्णय अपेक्षित होता. परंतू न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली असून पुढील सुनावणी 17 मार्चला होणार आहे.
15 वर्षाच्या मुलीवर तब्बल 33 नराधमांनी नऊ महिन्यांच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धककादायक घटना 23 सप्टेंबरला उघडकीस आली होती. या गुन्हयाचे दोषारोपपत्र कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात मानपाडा पोलिसांकडून सादर झाले आहे. दरम्यान या गुन्हयातील चार अल्पवयीन आरोपींची यापुर्वीच भिवंडी बाल न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. अल्पवयीन आरोपींचे दोषारोपपत्र 30 दिवसात दाखल होणो गरजेचे असते परंतू मानपाडा पोलिसांकडून ते सादर करायला दिड महिना लागल्याने दोघा अल्पवयीन आरोपींना जामिन मंजूर झाला तर अन्य दोघांना आरोप पत्रनंतर जामिन मंजूर करण्यात आला. दरम्यान चौघांना जामिन देण्याच्या भिवंडी बाल न्यायालयाच्या निर्णयाला पिडीताच्या वतीने डिसेंबर महिन्यात ठाणे येथील न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान शुक्रवारी यावर सुनावणी होती परंतू न्यायालयाने सुनावणी 17 मार्चला होईल असे स्पष्ट झाले.दरम्यान या गुन्हयातील अन्य चार आरोपींनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील विशेष पोक्सा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जावर १६ फेब्रुवारीला बुधवारी सुनावणी आहे. या गुन्हयाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यावर डिसेंबर महिन्यातच संबंधित आरोपींनी जामिन मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. 22 डिसेंबरला पहिली सुनावणी झाली होती. दरम्यान पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँड योगेंद्र पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. चौघांच्या जामिन अर्जावर निर्णय काय दिला जातो याकडे लक्ष लागले आहे.