इम्फाळ : मणिपूरमध्ये तीन महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा जो भीषण प्रकार ४ मे रोजी कंगपोकपी जिल्ह्यातील गावामध्ये घडला, त्याची पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरमधील माहिती अंगावर काटा आणणारी आहे. अत्याधुनिक शस्त्रे घेतलेले ८०० ते १००० लोक बी फिनोम या गावामध्ये घुसले. त्यांनी लोकांच्या घरांना आग लावली तसेच तीन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढली. इतकेच नव्हे त्याचे व्हिडीओही चित्रित केले. मैतेई युवा संघटना, मैतेई लिपून, कांगलेईपाक कनबा लुप, अरामबाई तेंगगोल, विश्व मैतेई परिषद या संघटनांच्या सशस्त्र कार्यकर्त्यांनी गावामध्ये धुमाकूळ घातला. कुकींवरील अत्याचार या व्हि़डीओद्वारे जगासमोर आणण्याचा आमचा उद्देश होता, असे आयटीएलएफने म्हटले आहे.
महिलांना सर्वांसमोर विवस्त्र केलेया लोकांपासून जीव वाचविण्यासाठी गावकरी जंगलात आश्रयाला गेले. त्यापैकी पाच जणांना मैतेई संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यात ५६ वर्षे वयाची एक व्यक्ती, त्यांचा १९ वर्षांचा मुलगा, २१ वर्षे वयाची मुलगी तसेच ४२ वर्षे व ५२ वर्षे वयाच्या दोन महिलांचा समावेश होता. त्यातील ५६ वर्षांच्या व्यक्तीची मैतेई जमावाने हत्या केली. त्यानंतर तीन महिलांना सर्व लोकांसमोर विवस्त्र केले.
सर्वांसमोर सामूहिक बलात्कार२१ वर्षे वयाच्या मुलीवर दिवसाढवळ्या सर्वांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या युवतीच्या धाकट्या भावाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याचीही जमावाने हत्या केली, तर विवस्त्र केलेल्यांपैकी दोन महिलांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने स्वत:ची सुटका करून घेतली व त्यांनी जंगलात पलायन केले. या दोन महिलांचा विवस्त्रावस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सर्वप्रथम इंडिजिनिअस ट्रायबल लीडर्स फोरम (आयटीएलएफ) या संघटनेकडून व्हायरल झाला.
संसदेत मणिपूर प्रश्नावरून गदारोळपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मणिपूरमध्ये सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करण्याची, तसेच नंतर त्यावर चर्चा करण्याची मागणी करत दोन्ही सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज एकदा आणि राज्यसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब केल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
...अशा प्रकारची शेकडो प्रकरणे घडत असतात
मणिपूरमध्ये महिलांचा विनयभंग करण्यात आला तसेच त्यांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढण्यात आली. अशा प्रकारची शेकडो प्रकरणे या राज्यात घडत असतात. रोज हिंसक घटना घडत आहेत. विवस्त्र धिंड काढल्याच्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. - एन. बीरेन सिंह, मुख्यमंत्री, मणिपूर
‘ते’ व्हिडीओ काढून टाका मणिपूरमधील महिलांवर झालेले अत्याचार व त्यांची विवस्त्र काढलेली धिंड यांचे व्हायरल झालेले व्हिडीओ काढून टाकावेत, असा आदेश केंद्र सरकारने ट्विटर व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना दिला. अशा घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर असणे अयोग्य असल्याचे सांगण्यात आले.