सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - नायझेरियन व्यक्तींमार्फत शहरात पसवले जात असलेले अमली पदार्थांचे जाळे गंभीर गुन्हेगारी कृत्यांना कारणीभूत ठरू लागले आहे. मोठ्या प्रमाणात तरुण नशेच्या आहारी जात असून त्यांना व्यसनी बनवण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जात आहेत. अशाच नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून वाशीतल सामूहिक बलात्काराचं कृत्य केलं गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून घडणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांमुळे स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची प्रतिमा मलीन होत चालली आहे. जागोजागी गर्दुल्यांचे अड्डे तयार झाले असून स्थानिक पोलिसांकडून वेळीच त्यावर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी एकमेकांच्या संगतीमुळे तरुणांमधील व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यांच्याकडून व्यसनासाठी गांजा, ब्राऊन शुगर, एमडी याशिवाय इतरही द्रव्य व पदार्थांचा वापर केला जात आहे. त्यापैकी गांजा व ग्राउन शुगरची मोठ्या प्रमाणात विक्री शहरात होत आहे. तर चिट्टी या टोपण नावाने विकला जाणारा ब्राऊन शुगर अत्यंत खालच्या दर्जाचा असल्याने त्याची नशाही तितकीच घातक ठरत आहे. सध्या बहुतांश रिक्षाचालक व गुन्हेगारी जगताकडे पाऊल टाकत असलेले तरुण या चिट्टीच्या आहारी गेलेले आहेत. त्याची नशा केल्यानंतर त्यांचे पूर्णपणे संतुलन बिघडत असून नशेमध्ये ते अनेकांवर जीवघेणे हल्ले देखील करत आहेत. अशाच प्रकारातून रिक्षाचालकांकडून प्रवाशी व इतर वाहन चालकांवर हल्ल्याचे प्रकार घडत आहेत. दिवस रात्र नशा करून रिक्षा चालवणाऱ्याचेही प्रमाण अधिक आहे. वाशी, कोपर खैरणे, घणसोली, ऐरोली आदी परिसरात असे बेधुंद रिक्षाचालक पहायला मिळत आहेत. तर सोमवारी रात्री ३४ वर्षीय तरुणावर सामुहिक बलात्कार करणारे तरुण देखील याच घातक ब्राऊन शुगरच्या नशेत असावेत असाही अंदाज वर्तवला जात आहे.मागील काही दिवसांपासून लोकमतने शहरात सुरु असलेल्या अमली पदार्थी विक्रीच्या जाळ्याचा भांडाफोड करण्यास सुरवात केली आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ठिकठिकाणी छापे टाकण्यास सुरवात केली आहे. यादरम्यान ब्राऊन शुगरच्या विक्रीत सक्रीय असलेल्या तडीपार गुंडाने पोलिसांवर हल्ला केल्याचा देखील प्रकार कोपर खैरनेत घडला. त्याचदरम्यान वाशीत गर्दुल्यांनी तरुणावर क्रूरपणे सामुहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली यावरून नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून शहरातील महिला व पुरुषांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नायझेरीयन व्यक्तींकडून नवी मुंबईत अमली पदार्थ पुरवले जात आहेत. मागील काही कारवायांमध्ये तसे स्पष्ट देखील झाले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्तही करण्यात आले आहेत. यानंतरही त्यांचे रॅकेट पूर्णपणे मोडीत काढण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.गावठाणांमध्ये मिळतोय आश्रयज्यादा रकमेच्या अमिषाला बळी पडून अनेकांकडून गावठाणातील घरे नायझेरीयन व्यक्तींना भाड्याने दिली जात आहेत. अशा वेळी पोलिसांपासून देखील त्यांची माहिती लपवली जात आहे. काही ठिकाणी संपूर्ण चाळी अथवा इमारती नायझेरीयन व्यक्तींच्या ताब्यात दिल्या जात आहेत. त्यांच्याकडून याचा फायदा गुन्हेगारी कृत्यांसाठी घेतला जात आहे.