सासवड : पुरंदर तालुक्यातील वाघापूर चौफूला येथील हॉटेल महाराजामध्ये दि २७ आॅगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास ५ ते ६ अनोळखी इसमांनी लोखंडी कोयत्याने कामगारांना मारून दहशत पसरवून दरोडा घातलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आले आहे. याबाबत सागर नानासाहेब( उरसळ, रा. सिंगापुर, ता. पुरंदर ) सासवड पोलीस स्टेशनमधे फिर्याद दाखल केली आहे. सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल असून सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे तपास करीत आहेत. ही घटनेत हाॅटेलचे कामगार प्रशांत वसंत बगाडे व प्रथमेश फडतरे यांना कोयत्याने मारहाण करण्यात आली होती व हाॅटेलच्या काऊंटरममधून १६ हजार ७०० रूपये रक्कम तसेच दशरथ वाघमारे व गणेश मंगळवेढेकर यांचा जिओ व विवो कंपनीचे मोबाईल हिसकावून घेवून रू २३ हजार ७०० चा ऐवज दरोडा टाकून चोरून नेला होता. हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उप विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार श्रीकांत माळी, हवालदार चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाठ, राजेंद्र चंदनशिव, पोलीस नाईक राजु मोमीन, गुरू जाधव, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, अमोल शेडगे, अक्षय जावळे यांच्या पथकाला नियुक्त केले हेाते. सदर पथकाला तपास करीत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत हा गुन्हा सागर उर्फ नानूभाई नाथू व त्याचे साथीदारांनी केलेला आहे तसेच तो व त्याचे साथीदार हे खंडोबानगर येथे एकत्रित जमलेले आहे अशी माहिती मिळाली. यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सासवड येथील खंडोबानगर येथे जाऊन सागर उर्फ नानूभाई बबलू नाथु ( वय १९ वर्षे ) रा. खंडोबानगर, सासवड, अनिल उर्फ जग्गू प्रमोद सोळंकी ( वय २० वर्षे), सनी भरत पवार ( वय २० वर्षे ), विकास उर्फ तर्री जितेंद्र मंडले ( वय २० वर्षे ) सर्व रा नाईकवाडा, सासवड यांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता सागर उर्फ नानूभाई याच्याकडे गुन्हयात गेलेला मोबाईल फोन मिळून आला तसेच सदर गुन्हा त्याने त्याच्या फरार साथीदारांसह केल्याचे निश्पन्न झाल्याने त्यांना पुढील कार्यवाहीकरीता सासवड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले. आरोपींनी सदरचा गुन्हा पैशाची चणचण असल्याने केल्याचे सांगितले. आरोपी हे रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापुर्वी सासवड पोलीस स्टेशनमधे गुन्हे दाखल आहेत.
हाॅटेलमध्ये कोयत्याने वार करून दरोडा घातलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2020 7:59 PM