लोणी काळभोर - दिवे घाटात परप्रांतीय ट्रकचालकास अडवून त्यास हात, लाथाबुक्क्या व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचेकडील ८ हजार ८०० रुपये रोख रकमेसह ड्रायव्हिंग लायसेन्स, एटीएम व पॅनकार्ड घेऊन जाणाऱ्या पाच जणांना लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.मंगलसिंग नगीना माथुर (वय ४३, सध्या रा. मंतरवाडी चौक, दुगार्माता मंदीर समोरच्या मोकळ्या जागेत, ऊरूळी देवाची, ता. हवेली. मुळ रा. ग्राम बंगरी, पो. मरवन चट्टी, तहसील बंगरी, जि. मुज्जफरपूर, बिहार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तुळशीराम शहाजी उघडे ( वय १९, सध्या रा. लेन क्रमांक ४, गोकुळनगर, कात्रज, पुणे. मूळ रा. कोरेगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर), लाला दादा वाघमारे (वय १८, सध्या रा. खवलेबाई यांचे खोलीत, लेन क्रमांक ४, गोकुळ नगर, कात्रज, पुणे. मूळ रा. मु. पो. सुस्ते, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या दोघांसह १७ वर्षे वयाच्या तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार मंगलसिंग माथुर हे मारूती काकडे (रा. माळवाडी, हडपसर) यांचे टाटा कंटेनर क्रमांक एमएच १८ एए ०७८० वर ड्रायव्हर म्हणून काम करतात. २३ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास हंडेवाडी (ता. हवेली) येथील फर्निटेक मीटिंग सिस्टीम या कंपनीतून सोफासेट भरून ते बेंगलोर येथे निघाले होते. सासवड, निरा, सातारामार्गे बेंगलोर येथे जाण्यासाठी ते दिवे घाटातील पहिल्या वळणावर आले त्यावेळी मागुन दोन दुचाकी वरून पांच जण आले. दुचाकी आडवी लावून त्यांनी कंटेनर थांबवला. दुचाकीवरून उतरून त्यातील दोघे क्लीनर तर तिघे ड्रायव्हर बाजूस असलेल्या दरवाजाकडे आले.दरवाजा उघडला नाही म्हणून एकाने क्लीनर बाजूकडे असलेल्या दरवाजाची काच दगडाने फोडली. यांमुळे माथुर घाबरून खाली उतरले. त्यानंतर दोघांनी त्यांना दमदाटी करून हात, लाथाबुक्क्या व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. इतरांनी त्यांचे पॅन्टचे मागील खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. त्यांत ८ हजार ८०० रुपये रोख रकमेसह ड्रायव्हींग लायसेन्स, एटीएम व पॅनकार्ड होते.
ट्रकचालकास लुटणारी टोळी जेरबंद , दोघांसह तीन अल्पवयीनांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:01 AM