नवी दिल्ली - हरियाणाच्या रेवाडीमध्ये १९ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून दोन जणांना अटक करण्यात आली. त्यात लष्करातील जवानाचाही समावेश आहे. ११ दिवस ते फरार होते. विशेष तपास पथकाने अखेर त्यांचा माग काढला. कोणत्याही वकिलाने आरोपींचे वकीलपत्र घ्यायचे नाही, असे आवाहन महापंचायतीमध्ये करण्यात आले.निशू फोगाट याला यापूर्वीच पकडण्यात आले. रविवारी पोलिसांनी मनीष आणि पंकज यांना पकडले. दोघांना महेंद्रगड जिल्ह्यातील सतनाली गावात अटक करण्यात आली. नाहड रेस्ट हाऊसमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. दोघांकडे चौकशी सुरू आहे. शेतातील घराचा मालक व तीन आरोपी अशा चार जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. याच घरात घटना घडली होती.हरियाणातील महेंद्रगडमध्ये १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या मुलीची शैक्षणिक कारकीर्द अत्यंत उज्ज्वल आहे. रेल्वेची परीक्षा देण्यासाठी तिने कनीना येथे शिकवणी लावली होती. पंकज, मनीष व निशू यांनी पीडितेचे कनीना येथून अपहरण केले.१२ तारखेला रेवाडी-झज्जर जिल्ह्याच्या सीमेवर शेतात नेले. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. रक्तस्राव झाला. एकूण १२ जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा तिच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. या मुलीला अतिरक्तस्राव होऊ लागल्याने एका बसथांब्यावर तिला सोडून ते पळून गेले. या अत्याचारामुळे देशभर संतापाची लाट निर्माण झाली आहे.ज्या शेतघरात विद्यार्थिनीवर बलात्कार झाला, तिचा मालक दीनदयाल याने त्या घराचे रूपांतर मद्यालयात केले होते. सामूहिक बलात्कारातील आरोपी अनेकदा तेथे गेले होते. निशू याच्या फेसबुक अकाऊंटमधील व्हिडिओमध्ये हे शेतघर दिसते.वकीलपत्र न घेण्याचे आवाहनदरम्यान, नुकत्याच झालेल्या कोसली कस्बा येथील महापंचायतीमध्ये २५ गावांमधील नागरिकांनी भाग घेतला. त्यावेळी कुणीही वकील आरोपींचा खटला लढणार नाही, असे ठरविण्यात आले. या महापंचायतीने राज्यपालांना निवेदन देण्याचे ठरविले आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.मानसिकता बदलत नाहीकेंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंह म्हणाले, फरार आरोपींना अटक झाली आहे. त्यांना कठोर शिक्षा केली जाईल. कायदा त्याच्या चौकटीत काम करतो, मात्र त्यामुळे लोकांची मानसिकता बदलू शकत नाही. बलात्कार रोखण्यासाठी समाजातूनच प्रयत्न झाले पाहिजे.
सामूहिक बलात्कारातील फरार आरोपी अखेर गजाआड, ११ दिवसांनी लागला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 5:28 AM