लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ओरिसातून विक्रीसाठी आणलेल्या गांजाची तस्करी करणाऱ्या पती राम पंगी उर्फ सूरज (३८, रा. कोरापूर, ओरिसा) याच्यासह नऊ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून दोन कोटी ७६ लाख ८० हजारांचा गांजा आणि टेम्पो असा दोन कोटी ८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गांजा या अमली पदार्थाची एका टेम्पोतून वाहतूक होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या भिवंडी युनिटच्या पथकाला एका खबऱ्याकडून मिळाली होती. त्याच आधारे २ सप्टेंबर २०२४ रोजी भिवंडीतील रांजनोली नाका येथील हायवेवर सापळा लावला. यावेळी घटनास्थळी एका टेम्पोतून आलेल्या सूरज याच्यासह तिघांवर पोलिसांना संशय आला. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या पथकाने टेम्पोला घेराव घालून त्यास अडवून त्याची तपासणी केली. त्यावेळी या टेम्पाेमध्ये तब्बल ५५३ किलो गांजा लपविल्याचे आढळले. पोलिसांनी हा सर्व गांजा आणि टेम्पो जप्त केला आहे.
याप्रकरणामध्ये सूरज याच्यासह अर्जुन लचना शेट्टी (२० , कोरापूर, ओरिसा), अमीन बाबू सैय्यद (३९, लोहा, नांदेड), सलीम गुलामनबी शेख (३०, संभाजीनगर), इम्रान हाजी अहमद शेख (३६, भिवंडी), रमजान वकील अहमद अन्सारी (२५, भिवंडी), नाजीम हाफिज फराद अन्सारी (४७, भिवंडी), अमित उर्फ किरण रंगराव सोनोने (३५, कल्याण), मार्कस मार्टिन म्हस्के (३६, विठलवाडी, उल्हासनगर) या नऊ आरोपींना अटक केली आहे. यातील पहिल्या तिघांनी हा गांजा विक्रीसाठी आणला होता तर उर्वरित सलीम शेख याच्यासह सहा जणांनी तो त्यांच्याकडून खरेदी करुन इतरत्र घेऊन जातांनाच पोलिसांच्या पथकाने ेत्यांना जेरबंद केले.