वर्धा : शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश पांडे आणि आदील शेख यांच्या दोन गटांत मंगळवारी रात्री ११.३० ते १२ वाजताच्या सुमारास राडा झाला. गुन्हेगारांचे हे दोन्ही गट एकमेकांना भिडल्याची घटना घडली. दरम्यान एका गुन्हेगाराने हवेत फायरींग देखील केली. या सशस्त्र हाणामारीत एका गटातील गुन्हेगार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित लोकांना किरकोळ जखमा झाल्या. हा थरार स्टेशनफैल नूरी मशिदी समोर होताना नागरिकांनी डोळ्याने पाहिला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सात आरोपींना रात्रीच अटक केल्याची माहिती आहे.
आदिल शेख, शोएब पठाण, गौरव विरखडे, छोटू उपाध्याय, संजय जयस्वाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तर दुसऱ्या गटातील राकेश पांडे आणि राहुल मडावी यांनाही अटक करण्यात आली आहे. अजिंक्य उर्फ अज्जू बोरकर हा गंभीर जखमी असून त्याच्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहे. उर्वरित आरोपींचा शोध गुन्हे शाखेचे पोलिस घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बोरगाव येथील रहिवासी अक्षय पटले याला चार दिवसांपूर्वी विकास पांडे याने शिवीगाळ केली होती. त्यांच्यात शाब्दीक वाद झाला होता. दरम्यान अक्षयने ही बाब आदिल शेख याला सांगितली. आदिलने विकास पांडेला फोन करुन शिवीगाळ का केली याबाबत जाब विचारला मात्र, दोघांमध्येही फोनवरुन झालेल्या संभाषणातही वाद झाला. विकास पांडे याने याची माहिती राकेश पांडे याला दिली. दरम्यान जुने वैमनस्य संपवून पुन्हा एकत्र येण्यासाठी आणि हा वाद येथेच संपविण्यासाठी स्टेशनफैल परिसरातील नूरी मस्जीद परिसरात बैठक घेऊन चर्चा करण्याचे ठरले. २८ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास आदिल शेख, शोएब पठाण, गौरव विरखडे, छोटू उपाध्याय, संजय जैस्वाल हे स्टेशनफैलात सशस्त्र पोहचले. तसेच दुसऱ्या गटातील अजिंक्य बोरकर, राकेश पांडे, राहूल मडावी, गणेश पेंदोर, विकास पांडे, दादू भगत, रितीक तोडसाम, समीर दालगरम यांच्यासह दोन ते तीन युवक घटनास्थळी पोहचले. मात्र, दोन्ही गट आमने सामने येताच त्यांच्यात सशस्त्र हाणामारी सुरु झाली.
काहींनी हातात फरशा तर धारदार शस्त्र घेऊन एकमेकांना मारहाण सुरु केली. दरम्यान गणेश पेंदोर याने जवळील पिस्टल काढून हवेत गोळीबार केला. या हाणामारीत अजिक्य बोरकर गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही गटातील गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करीत एका गटातील पाच तर दुसऱ्या गटातील दोन आरोपींना रात्रीच अटक केली. घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
एक गोळी सुटली एक अडकली...स्टेशनफैलात सुरु असलेला फिल्मी राडा नागरिक आपल्या डोळ्याने पाहत होते. दरम्यान गणेश पेंदोर याने त्याच्याजवळील पिस्टल काढून हवेत एक राऊंड फायर केला. तसेच दुसरा राऊंड फायर करताना ती गोळी अडकून खाली पडली. विशेष म्हणजे बंदुकीतून निघालेली गोळी ९ एम.एम.ची होती, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.