मथुरा: उत्तर प्रदेशच्या मथुरेत चालत्या कारमध्ये तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्काराला पोलिसांनी एकट्याने बलात्कार केल्याच्या प्रकरणात बदलले आहे. न्याय न मिळाल्याने पीडित तरुणीने विष प्राशन केले. धक्कादायद बाब म्हणजे ही तरुणी पीएसआयची परीक्षा देऊन पोलीस अधिकारी होण्याची स्वप्ने पाहत होती. तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली असून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे.
पीडिता मंगळवारी आग्रा येथून पीएसआयचा पेपर देऊन घरी परतत होती. यावेळी कोसीकला पोलीस ठाण्याच्या परिसरात नॅशनल हायवे-19 वर तिच्यावर तीन लोकांनी बलात्कार केला. तसेच तिला कारमधून ढकलून देत पसार झाले. पीडितेच्या भावाने कोसीकला पोलिसांत तक्रार केली. मात्र, पोलिसांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार नाही तर एकट्यानेच बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला.
यामुळे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणीने न्याय मिळत नसल्याचे पाहून धक्कादायक पाऊल उचलले. यामुळे तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. पोलिसही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पीडितेला मीडियापासून दूर ठेवले जात आहे. तसेच तिच्या कुटुंबियांना देखील भेटू दिले जात नाहीय. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. आता आग्राचे आयजी देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत.