मेरठ : उत्तर प्रदेशात योगी सरकारने गुन्हेगारांविरोधात नो टॉलरंस पॉलिसी अवलंबली आहे. या अंतर्गत कुख्यात गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कारवाई सुरुच आहे. आज पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार अनिल दुजाना (Anil Dujana) चकमकीत ठार झाला आहे. मेरठ जिल्ह्यात युपी एसटीएफने त्याचा खात्मा केला. यूपी एसटीएफचे प्रमुख आयपीएस अमिताभ यश यांच्याकडून ही माहिती समोर आली आहे.
अनिल दुजाना उर्फ अनिल नागर याला एसटीएफने चकमकीत ठार केले आहे. यूपी एसटीएफने मेरठमध्ये ही कारवाई केली आहे. अनिल हा मोठा गुन्हा करण्याचा कट आखत असल्याची माहिती एसटीएफला मिळाली होती. त्यामुळे त्याचा शोध सुरू झाला. याच क्रमाने तो मेरठमध्ये लपल्याची माहिती मिळाली. यावेळी झालेल्या चकमकीत तो ठार झाला.
विशेष म्हणजे, आज यूपी एसटीएफ लॉन्च होऊन 25 वर्षे झाली आहेत आणि आजच्याच दिवशी मोठे यश मिळाले आहे. अनिल दुजाना याच्यावर खंडणी, लूटमार, जमीन बळकावणे, शस्त्रास्त्र कायद्यासारख्या गंभीर कलमांतर्गत 62 गुन्हे दाखल आहेत, त्यात 15 खुनाचा समावेश आहे. यूपी पोलिसांनी त्याच्यावर रासुका आणि गँगस्टर कायदाही लावला होता. नुकतीच गौतम बुद्ध नगरमधील गुंडांची यादी पोलिसांनी उघड केली. त्यात त्याच्या नावाचाही समावेश होता.
गँगस्टर सुंदर भाटीवर हल्ला अनिल दुजाना यानीच गँगस्टर सुंदर भाटीवर AK 47ने गोळीबार केला होता. अनिल दुजानाने त्याच्या साथीदारांसह सुंदर भाटीवर गाझियाबादच्या भोपुरा भागातील एका फार्महाऊसमध्ये त्याच्या मेव्हण्याच्या लग्नात हल्ला केला, ज्यामध्ये गँगस्टर रणदीपनेही त्याला साथ दिली होती. त्या हल्ल्यात सुंदर भाटी बचावला, पण तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2014 मध्ये सुंदर भाटी टोळीने बदला घेण्यासाठी अनिल दुजाना याच्या घरावर हल्ला केला, ज्यामध्ये अनिल दुजानाचा भाऊ जय भगवान मारला गेला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात कुख्यात गुन्हेगार अतिक अहमदचा मुलगा असद अहमदला युपी एसटीएफने चकमकीत ठार केले होते. त्या घटनेच्या काही दिवसानंतर अतिक आणि अशर्फची पोलिसांसमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या घटनेमुळे युपी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर चहुबाजूंनी टीका होत आहे.