जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मुंबई आणि ठाण्यातून हद्दपार केलेल्या सचिन विनय शर्मा (२०, रा. वागळे इस्टेट, ठाणे ) या गुंडाला गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी दिली.
सचिन शर्मा याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी त्याला ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या तीन जिल्ह्यांमधून वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी २७ मार्च २०२२ रोजी हद्दपारीचे आदेश दिले होते. तरीही तो वागळे इस्टेट परिसरात मोकाट फिरत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे या पथकाने २० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अंबिकानगर क्रमांक दोन वागळे इस्टेट परिसरातून त्याला ताब्यात घेतले.