लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध पोलीस ठाण्यांमध्ये ३७ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला कुख्यात गँगस्टर इलियाज अब्दुल अजीज खान ऊर्फ इलियाज बचकाना याला गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने (सीआययू) बेंगळुरूमधून अटक केली. पुढील तपासासाठी त्याचा ताबा भायखळा पोलिसांना देण्यात आला आहे.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये डॉकयार्ड रोड येथील एका कार्यालयात सर्फराज लुलाडिया (३५) व्यावसायिकावर बचकाना याच्या टोळीने हल्ला करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. लुलाडिया व त्यांच्या मित्रांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पोलिसांनी यातील हल्लेखोर आरोपी वाजीद शेख (४०) याला अटक केली. भायखळा पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासह मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करून वाजीद शेख याच्यासह करीम ऊर्फ शालू खान, मोहम्मद सैफ शेख व हिफजूर हमीद या चौकडीला बेड्या ठोकल्या आहेत. बचकाना व मोबीन शेख ऊर्फ मोबीन बाटला यांच्या सांगण्यावरून हे केल्याचे समोर आले होते. त्यामुळे भायखळा पोलिसांसह गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सीआययूचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांच्या पथकाला बचकाना हा बेंगळुरू येथे लपल्याची माहिती मिळाली. सीआययूच्या पथकाने बेंगळुरूमधील हॉटेलमधून बचकाना याला अटक केली.
मध्य मुंबईत टोळीची दहशत बचकाना हा पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार असून, त्याची स्वत:ची एक टोळी आहे. या टोळीची मध्य मुंबईत प्रचंड दशहत आहे. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, ड्रग्ज तस्करी, घातक शस्त्रांची विक्री करणे आणि घातक शस्त्रे बाळगणे, त्यांचा गुन्ह्यात वापर करणे अशा ३७ गुन्ह्यांची नोंद आहे.