मुंबई - हरियाणाचा कुख्यात गुंड संदीप गडोली याची पोलिसांच्या मदतीने हत्या घडवून आणणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनीहरयाणा येथील गुरुग्राममधून अटक केली आहे. बिंदर गुर्जर असं या आरोपीचं नाव आहे. आज कोर्टात त्याला हजर केले असता गुर्जरला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बिंदर आणि गडोली यांच्यात असलेल्या वादातूनच बिंदरने पोलिसांच्या मदतीने संदीपचा अंधेरी येथील हाॅटेलमध्ये एन्काऊंटर केला होता. या प्रकरणात बिंदरचा मागील अनेक दिवसांपासून पोलिस शोध घेत होते.अंधेरी येथील एका हॅाटेलमध्ये आरोपी संदीप गडोली त्याची मैत्रिण आणि मित्रांसह थांबला होता. दरम्यान,७ फेब्रुवारी २०१६ रोजी हरयाणाच्या गुरुग्राम पोलीस ठाण्याचे आठ पोलीस मुंबईत आले होते. त्यावेळी हरियाणा पोलिसांनी अंधेरी(प.) येथील हॉटेलमध्ये घुसून गडोलीवर गोळ्या झाडल्या होत्या. या बनावट चकमकीत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलिस उपनिरीक्षक प्रद्मुमन यादव, दीपककुमार, विक्रम सिंग आणि जितेंद्र यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. या सर्वांना हरयाणा पोलिसांनी निलंबीत केले होते. मात्र कॉन्स्टेबल परमजीत अहलावट हा फरार झाला होता. मागील सहा महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान गुरूवारी गुरुग्राम येथे पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांवर केलेल्या कारवाईत परमजीतला अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीत त्यांनी संदीपची हत्या ही हरयाणातील एका गँगस्टरच्या सांगण्यावरून केल्याची कबूली दिली.
गडोली हत्या प्रकरणाचा तपास हे गुन्हे शाखा १० चे पोलीस करत होते. पोलीस हे हरयाणातील गँगस्टर बिंदरच्या मागावर होते. मात्र वेळोवेळी बिंदर हा पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरायचा. हरयाणात नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत एका उमेदवाराच्या रॅलीत बिंदर मोकाट फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हरयाणा पोलिसांच्या मदतीने त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी पोलस आता बिंदरची चौकशी करत आहेत.