- किरण शिंदे
पुणे : काही दिवसांपूर्वी गँगस्टर शरद मोहोळ याचा पुण्यातील त्याच्या राहत्या घराजवळच गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्याच्यासोबत राहणाऱ्या साथीदारांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. या दोघांनी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल आरोपींना पुरवले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गॅंगस्टर शरद मोहोळचा खून संगणमत करून आणि कट रचून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी या गुन्ह्यात भादवी कलम १२० (ब) वाढ केले आहे. दरम्यान, यातील ६ आरोपींच्या कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे.
धनंजय मारुती वटकर (वय 25, रा. कराड आणि सतीश संजय शेडगे (वय 28, रा. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या गुन्ह्यात यापूर्वी साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा, कोथरुड), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, ता. मुळशी), अमित उर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. स्वराज्य मित्र मंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड, ता. मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरुड) अशी पोलीस कोठडीत वाढ झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कोथरूड पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
गँगस्टर शरद मोहोळचा (दि. ५ जानेवारी) भरदुपारी त्याच्या सुतारदरा येथील घरासमोर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. शरद मोहोळ याच्यावर ३ जणांनी गोळ्या झाडल्या. तपासात आरोपींनी मुळशी तालुक्यात तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्याचा सराव केला आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास करायचा आहे. आरोपी यांनी संगनमत व कटकरून हा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कसून तपास करण्यात येत आहे. त्यांच्यात आर्थिक उलाढाल मोठी झाली असण्याची शक्यता आहे. त्याबाबत तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत 7 दिवसांची वाढ केली आहे.