सदानंद नाईक
उल्हासनगर : केबल व्यावसायिक सचु केबलवाला यांच्या खूनासह इतर व्यापाऱ्याच्या खंडणीच्या गुन्ह्या प्रकरणी हवा असलेला कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी याला उल्हासनगर पोलिसांनी गुरवारी ताब्यात घेतले. पुजारी याच्या उलट तपासणीत तो कोण कोणाचे नाव घेतो. याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर गोलमैदान येथिल कार्यालयात केबलचालक सच्चीदानंद कारीरा बसला असतांना त्याच्या कार्यालयात घुसून सुरेश पुजारी याच्या गुंडांनी गोळीबार केला होता. गोळीबारात गंभीर जखमी झालेले कारीरा यांचे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकारने उल्हासनगरात सुरेश पुजारीचा दहशत निर्माण झाली. याच दहशतीच्या जोरावर त्याने शहरात खंडणीसत्र सुरू केले. खंडणीचे अनेक गुन्हे पुजारी याच्यावर दाखल झाले. तसेच उघोगपती सुमित चक्रवर्ती यांच्या कार्यालयात घुसूनही पुजारीच्या गुंडांनी गोळीबार केला होता. दरम्यान ऑक्टोंबर सन-२०२१ रोजी कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये मुंबईच्या एटीएस पथकाने अटक केली.
ठाणे व मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यात सुरेश पुजारी याच्यावर विविध ३७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी विविध पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरु आहे. गँगस्टर रवी पुजारी पासून वेगळे होऊन सुरेश पुजारीने ८ ते ९ वर्षांपूर्वी स्वत:ची टोळी निर्माण केली. सुरेश पुजारी हा यापूर्वी उल्हासनगर मधील विश्वास ढाब्यावर नोकरी करत होता. तर घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज येथे राहात होता. तेथूनच त्याने गुन्हेगारी सुरू केली होती. त्यानंतर नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील डान्सबार मालकांकडे खंडणीचे सत्र सुरु केले.
एसीपी राठोड करणार चौकशी
उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी पत्रकारां सोबत संवाद साधून केबलचालक सचु उर्फ सचानंद कारीरा यांच्या हत्या प्रकरणी तसेच सुरेश पुजारीच्या गुंडांनी उखळलेल्या खंडणी प्रकरणाची स्वतः चौकशी करणार आहे. कारीरा यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यत १२ जणांना अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच हत्येप्रकरणी आज सुरेश पुजारीला उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.