नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील तिहार तुरुंगात गँगस्टर टिल्लू ताजपुरियाची हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. टिल्लू ताजपुरियावर प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांनी हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी कोर्टात झालेल्या गोळीबारातील आरोपी गँगस्टर टिल्लू ताजपुरिया याच्यावर तिहार तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळी सदस्य योगेश टुंडा आणि इतरांनी लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी टिल्लू ताजपुरियाला दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेले. याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस तपासात गुंतले आहेत.
गोगी हत्याप्रकरणात टिल्लू ताजपुरियाचे नाव आले होते समोर दिल्लीतील गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याची 24 सप्टेंबर 2021 रोजी दिल्लीच्या रोहिणी कोर्टात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुनील उर्फ टिल्लू ताजपुरियाचे नाव समोर आले होते. जितेंद्र उर्फ गोगी रोहिणी कोर्ट क्रमांक 207 मध्ये दाखल होताच हल्लेखोरांनी गोळीबार केला. पहिली गोळी त्याच्या पाठीला लागली. गोळी लागताच त्याने मागे वळून हल्लेखोरांकडे पाहिले, तेव्हा त्याच्या छातीत दुसरी गोळी लागली.
गोळीबार होताच कोर्ट रुममध्ये चेंगराचेंगरी झाली. न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांनी आपापल्या रुममध्ये जाऊन आपले प्राण वाचवले. तेथे उपस्थित इतर वकील अहलमद यांच्या रुममध्ये घुसले. गोळी लागताच गोगीसोबत आत गेलेल्या कमांडोंनी हल्लेखोरांवर गोळीबार करून त्यांना ठार केले. हे हल्लेखोर टिल्लू टोळीचे सदस्य होते.