बिकरू हत्याकांडात आठ पोलिसांच्या हत्येनंतर आता गावात विचित्र घटना घडत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केलाय. घटनेच्या अडीच महिन्यानंतर आता कुठे दिवसा काही लोक बाहेर दिसतात. पण सायंकाळ होताच गावातील लोक घरांमध्ये स्वत:ला कैद करून घेतात. याचं कारण ते सांगतात विकास दुबेचं भूत. गावकऱ्यांनी दावा केलाय की, गॅंगस्टर विकास दुबेचं भूत रात्री त्याच्या घरावर बसलेलं दिसतं. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण घरातून बाहेर येत नाही.
बिकरू या गावात गॅंगस्टरकडून आठ पोलिसांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर एन्काउंटरमध्ये पोलिसांच्या हातून विकास दुबेसहीत गावातील सहा लोक मारले गेले होते. गावकऱ्यांनुसार, रात्रीच्या वेळी अजूनही त्यांना गोळ्यांचा आवाज ऐकू येतो. काही लोकांनी दावा केलाय की, त्यांना रात्री विकास दुबेचं भूत पाहिलं. त्यांनी हेही सांगितलं की, विकास दुबे त्याच्या पडक्या घरात दिसतो. आम्ही या घरात काही लोकांना चर्चा करतानाही ऐकलंय. मधेच थोडा हसण्याचा आणि गंमत करण्याचाही आवाज ऐकलाय. विकास दुबे जिवंत असताना या घरातून जसे आवाज येत होते तसेच आवाज आताही येतात. गावातील एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की, गेल्या आठवड्यात जेव्हा ते रात्री घराबाहेर निघाले तेव्हा त्यांनीही विकास दुबे भूत पाहिलं.
गावकऱ्यांनी सांगितलं की, जसा सूर्य मावळतो, लोक लवकरात लवकर घरी परततात आणि दरवाजे बंद करून घरात बसतात. आता आधीसारखे लोक दिवसा किंवा सायंकाळी एकमेकांशी बोलत नाहीत. सूर्य मावळताच सगळीकडे एक भयाण शांतता पसरते. बिकरूतील लोक पूर्ण विश्वासाने सांगतात की, लोकांना अजूनही रात्री बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येतो.
बिकरू हत्याकांड होऊन आता अडीच महिने झाले आहेत. यात आठ पोलिसांची हत्या करण्यात आली होती. दोन-तीन जुलैच्या रात्री बिकरू हत्याकांडानंतर सरकारने विकास दुबेचं घर तोडलं होतं. पण गावातील लोक अजूनही विकास दुबेचं भूत बघितल्याचा दावा करतात.