हरियाणाच्या गुरुग्राम इथं २७ वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजाची मंगळवारी रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली. दिव्या पाहुजा ही गँगस्टर संदीप गाडोलीची गर्लफ्रेंड होती. दिव्याच्या मर्डरची कहानी पूर्ण फिल्मी आहे. हत्येच्या आरोपात पोलिसांनी ज्यांना अटक केली त्यांच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे झाले. पोलिसांनी दिव्याच्या हत्येतील आरोपी अभिजीत सिंह, ओम प्रकाश आणि हॉटेलमथ्ये काम करणारा हेमराजला अटक केली. ओमप्रकाश आणि हेमराजनं दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली असा आरोप आहे.
अभिजीत सिंहनं दिव्याच्या मृतदेह नष्ट करण्यासाठी १० लाख रुपये दिले होते. त्यानंतर इतर दोन्ही आरोपींनी दिव्याचा मृतदेह अभिजीतच्या निळ्या रंगाची बीएमडब्ल्यू कारमधून घेऊन फरार झाले होते. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पोलिसांनी जेव्हा आरोपींची चौकशी केली तेव्हा त्यातील मुख्य आरोपी अभिजीत सिंहने सांगितले की, मी हॉटेल सिटी प्वॉईंटचा मालक आहे. हे हॉटेल मी भाड्याने घेतलंय. या हॉटेलमध्ये दिव्या पाहुजाची गोळी मारून हत्या केली. माझे काही अश्लिल फोटो दिव्याकडे होते. त्या फोटोवरून ती मला सातत्याने ब्लॅकमेल करत होती. माझ्याकडे पैशांची मागणी करायची. काही दिवसांपासून तिची पैशांची मागणी वाढली होती. २ जानेवारीला दिव्याला घेऊन हॉटेलवर पोहचलो. तिला फोटो डिलीट करण्यास सांगितले. पण तिने केले नाही. त्यातून वाद झाला आणि रागाच्या भरात मी दिव्याला गोळी मारली असं त्याने कबूल केले.
त्यानंतर हेमराज आणि ओम प्रकाश यांच्या मदतीने मी दिव्याचा मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढत बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवला आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कार दोघांना दिली. सध्या पोलीस मृतदेह घेऊन फरार झालेल्यांचा शोध घेत आहे. मॉडेल दिव्या गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणारी होती. ती हरियाणातील गँगस्टर संदीप गाडोलीची गर्लफ्रेंड होती. हरियाणा पोलीस संदीपला शोधत होती. ७ फेब्रुवारी २०१६ रोजी हरियाणा पोलिसांना संदीप मुंबईतील अंधेरी इथं एका हॉटेलवर असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस त्याच्या शोधात मुंबईला पोहचली. त्यात पोलिसांनी मुंबईत संदीपचा एन्काऊंटर केला.ज्यावेळी संदीप गाडोलीचा एन्काऊंटर केला तेव्हा दिव्या त्याच्यासोबत त्याच हॉटेलमध्ये होती. ती या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. हरियाणा पोलिसांनी मुंबईत एन्काऊटर केल्यानंतर मुंबई पोलीस याचा तपास करत होती. मुंबई पोलिसांनी या घटनेत दिव्याला साक्षीदार बनवलं होते.