उत्तर प्रदेशच्या चित्रकूट तुरुंगामध्ये आज गॅंगवॉर रंगला होता. कैद्यांच्या दोन गटांकडून एकमेकांवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तुरुंगात असलेल्या दोन कैद्यांची या गोळीबारात हत्या झाली. हत्या झालेला एक गुंड आमदार मुख्तार अन्सारी यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हत्या करणाऱ्या गँगस्टरचा पोलिसांनी चकमकीमध्ये खात्मा केला. या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली असून पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
काही दिवसांपूर्वी सुल्तानपूर तुरुंगातून चित्रकूट येथील तुरुंगात अंशु दीक्षित या गुंडाला हलवण्यात आले होते. दीक्षित पूर्वांचलमधील कुख्यात गँगस्टर आहे. त्याने चित्रकूट तुरुंगामध्ये असलेल्या मुकीम काला आणि मेराज या दोन गँगस्टरची हत्या केली आहे. यापैकी मुकीम काला याच्यावर सरकारने बक्षीस जाहीर केले होते. दुसरा हत्या झालेला मेराज हा आमदार मुख्तार अन्सारीचा निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.
तुरुंगामध्ये गोळीबार झाल्यानंतर जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर अंशु दीक्षित आणि पोलिस पथकामध्येही गोळीबार झाला. या गोळीबारात अंशु दीक्षित ठार झाला. अंशु दीक्षितने या दोघांची हत्या केल्यानंतर तुरुंगातील आणखी पाच कैद्यांनाही बंदी बनवलं होतं. पोलिसांनी त्या बंदी बनवलेल्या कैद्यांना सोडण्यास सांगितलं, पण त्याने ऐकलं नाही, त्यामुळे पोलीस आणि अंशु यांच्यात चकमक झाली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेनंतर तुरुंगामध्ये सध्या तपास मोहीम राबवली जात आहे. या संपूर्ण घटनेमध्ये मृत्यू झालेले तिन्ही कैदी हे कुख्यात गँगस्टर होते. या गुन्हेगारांचं परस्पर शत्रुत्व होते. त्यामुळेच हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मात्र, तुरुंगामध्ये गुंडांकडे शस्त्र आणि इतर साहित्य कसं पोहोचलं याचा सध्या शोध घेतला जात असून याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.