मुंबई - मुंबई पोलीस दलात गेले अनेक वर्ष कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील पोलीस आणि जनतेतील दरी दूर करण्यासाठी प्रयत्न केला आहे. मुख्यत्वेकरून या पोलीस अधिकाऱ्याच्या घरी देखील पोलिसांच्या गणवेशातील बाप्पा म्हणजेच पोलीस बाप्पाची मूर्ती विराजमान झाली आहे. राजेंद्र काणे यांनी यावर्षी पोलीस दादा या गाण्याची निर्मिती केली असून त्यांची हि संकल्पना आहे. गेल्या चार महिन्यापासून काणे यांनी मेहनत घेऊन या गाण्याची निर्मिती केली. हे गीत अरुण काशिद यांनी लिहिले असून हे गाणं अमित खुरपे यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणं निखिल मधाळे यांनी गेले आहे.
याबाबत राजेंद्र काणे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले, सुखकर्ता, दुःखहर्ता जसं म्हणतो त्याचप्रमाणे सदरक्षणाय खलनिग्रणाय हे मुंबई पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे. जनतेच्या सुख, दुःखात आम्हाला सामील व्हावं लागतं. म्हणून मनात अशी संकल्पना सुचली आणि मी त्याप्रमाणे काशिद यांच्याकडून गाणं बनवून घेतलं. नागरिक आणि पोलिसानांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी जनजागृतीपर हे गाणं बनवले असून हे गाणं मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते रिलीज करण्यात आले. हे गाणे विक्रीस नसून ते लोकांच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आले असल्याची माहिती काणे यांनी पुढे दिली.
Ganpati Festival : भेटा पोलीस बाप्पाला; मुंबई पोलीस अधिकाऱ्याने घरी आणलीय आगळी गणेशमूर्ती