मुंबई - यंदा गणेशोत्सव आणि मोहरमचा सण शांततेत पार पडावा म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांची सुरक्षा, महिलांची होणारी छेडछाड यासारखे प्रकार रोखण्यासाठी साध्या गणवेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. लालबागच्या राजाचे आणि लालबागमधील गणेश मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता याठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहशतवादी कारवायांना आला घालण्यासाठी राज्य दहशतवादविरोधी पथक देखील करडी नजर ठेवून असणार आहे.
मुंबईत यंदा एकूण सार्वजनिक ६ हजार ४५५ गणपती असून, घरगुती १ लाख ५५ हजार ४१४ गणपती असणार आहेत. याबरोबरच गौरी स्थापना ११ हजार ८१३ होणार असून मुंबईतील १६२ ठिकाणी विसर्जन होणार आहे. गर्दीच्या ठिकाणी होणारे गुन्हे रोखण्यासाठी साध्या गणवेशात पोलीस तैनात राहणार आहेत. गर्दीच्या दृष्टिकोनातून मुंबईतील लालबाग, गिरगावसारख्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला आहे. गणेश उत्सवादरम्यान सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, बिडीडीएस, मुबंई वाहतूक विभाग आणि होमगार्ड यांची मदत घेतली जाणार आहे. मुंबईतील ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निगराणी केली जाणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र उभारले जाणार आहे. चौपाटीवर लाईफ गार्डस तैनात असून नौदल व कोस्ट गार्डसोबत समन्वय ठेवला जाणार आहे.