घारगाव (जि. अहमदनगर) : चोरट्यांच्या टोळीकडून संगमनेर तालुक्यातील एटीएम टार्गेट केले जात आहे. त्यामुळे एटीएम सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील घारगाव गावच्या शिवारात स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. या एटीएममधून १९ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. नाशिक-पुणे महामार्गालगत तालुक्यातील घारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएमला लक्ष्य करत गॅस कटरच्या साहाय्याने फोडले. सीसीटिव्ही कॅमेर्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारत डीव्हीआर लंपास केला. एटीएममधून सुमारे १९ लाख रुपयांची रक्कम चोरीला गेली असल्याचे बँकेच्या शाखेचे शाखाधिकारी कांचन दाभाने यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष फड आदींनी धाव घेतली. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्याचे काम सुरू असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गॅस कटरने SBI चे एटीएम फोडले; १९ लाख रुपयांची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 11:42 AM