गजबजलेल्या पायधुनी परिसरात एका मूक बधिराची दोन मूक बधिरांनी क्रूरपणे हत्या केली. मृतदेह बॅगेत भरून टॅक्सीने सीएसएमटी स्थानक गाठले. लोकलने दादर स्थानक गाठून कोकणात जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्याची लगबग सुरू झाली. मृतदेह ओढताना झालेली दमछाक पाहून पोलिसांना संशय आला. तपासणीत बॅगेत मृतदेह निघाल्याने दादर स्थानकात खळबळ उडाली. मात्र, आव्हान पुढे होते. समोरची व्यक्ती कोण?, मृतदेह कुणाचा?, का मारले?, कोणी मारले? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती पोलिसांकडून सुरू होती. मात्र, आरोपी जय चावडा मूक बधीर असल्याने त्याला पोलिसांची भाषा समजत नव्हती, ना पोलिसांना त्याची.
पोलिसांनी कागदावर प्रश्न लिहून त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याबाबतही तो सहकार्य करत नव्हता. दुसरीकडे, रात्रीच गुन्ह्याचे गूढ उलगडण्याचे आव्हान यंत्रणेसमोर होते. दादर जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांच्या नेतृत्वात तपास सुरू झाला. रात्री दोन वाजता एक पथक मूक बधिरांची भाषा ओळखणाऱ्याचा शोध घेण्यासाठी साधना कॉलेजच्या दिशेने निघाले.
भोईवाडा पोलिस वसाहतीत राहणारे राजेश सातपुते हे आरएके मार्ग पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा गौरव दादरच्या साधना शाळेत शिकला. दोघांनाही सांकेतिक भाषा अवगत होती. राजेश सातपुते रात्री दोन वाजता नाकाबंदी कारवाईत सहभागी होते. इतक्यात रेल्वे पोलिसांची गाडी तेथे आली. थोड्या वेळापूर्वी दादर स्थानकात मृतदेह भरलेली बॅग वाहून नेणाऱ्या मूक बधीर व्यक्तीस अटक केली. त्याची चौकशी करण्यासाठी दादरच्या साधना शाळेची, सांकेतिक भाषा अवगत असलेल्या व्यक्तीची माहिती शोधत आहोत, असे त्यांनी सांगितले.
२० तास सलग काम करणारे सातपुते लगेचच पुढे झाले. त्यांनी आपला मुलगा मूक बधीर असून, आम्हा दोघांना सांकेतिक भाषा अवगत आहे, असे सांगत सहकार्य करण्यास तयार झाले. त्यांनी आपला मुलगा गौरव यास उठवून दादर स्थानकातील रेल्वे पोलिस ठाण्यात आणले. सातपुते पिता-पुत्राने जय चावडाची चौकशी केली. तपास अधिकाऱ्यांचे प्रश्न सातपुते मुलाला सांकेतिक भाषा करून विचारायचे. पुढे मुलगा जय चावडाकडे याबाबत चौकशी करायचा. जयकडून आलेली उत्तरे वडिलांना सांगून वडील पुढे तपास अधिकाऱ्यांना माहिती देत होते. मृत व्यक्ती अर्शद शेख, आरोपींची नावे, हत्या का, कुठे, कशी झाली? यासोबत अन्य महत्त्वाचे तपशील सातपुते पिता-पुत्राने आरोपीशी संवाद साधत काढून घेतले.
याच माहितीच्या आधारे पायधुनी पोलीस अन्य आरोपींना वेगाने अटक करू शकले, पुरावे गोळा करू शकले. या सायलेंट किलिंगमागच्या व्हायलेंट स्टोरीचा उलगडा झाला. हत्या करणारा शिवजीत सिंगसह अर्शदच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली. हत्याकांडामागे थेट बेल्जियम कनेक्शन समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली. तर, सातपुते यांच्या या कर्तव्यनिष्ठेबद्दल संपूर्ण पोलिस दलातून त्यांचे कौतुक सुरू आहे. मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी देखील मुंबई पोलिसांचा ‘गौरव’ असे म्हणत त्याचे कौतुक केले. भविष्यात अशा घटनांच्या तपासासाठी मूक बधिरांच्या भाषा अवगत असलेल्याना पोलिसांशी जोडण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.