नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार गौतम गंभीरला (Gautam Gambhir) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत गौतम गंभीरने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, 'इसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप गौतम गंभीरने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. डीसीपी सेंट्रल श्वेता चौहान यांनी सांगितले की, गौतम गंभीर यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गौतम गंभीर यांनी काल रात्रीच ही तक्रार दाखल केली आहे. इसिस काश्मीरने फोन आणि ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गौतम गंभीर यांच्याकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, याआधीही दोन वर्षापूर्वी गौतम गंभीरने परदेशातून जीवे मारण्याची धमकी आल्याचे सांगत पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. त्यावेळी खासदार गौतम गंभीरने शहादारा जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक यांना पत्र लिहिले होते. यात गौतम गंभीरने “मला आणि माझ्या परिवाराला परेदशी क्रमांकावरून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याबबात मी तक्रार नोंदवली आहे. तरी माझी सुरक्षा वाढवण्यात यावी”, अशी मागणी केली होती.
गंभीरचे क्रिकेट करिअरगौतम गंभीरने भारतीय संघासाठी 58 कसोटी सामने, 147 एकदिवसीय सामने आणि 37 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 58 कसोटींमध्ये त्याने 41.95 च्या सरासरीने 4 हजार 154 धावा केल्या आहेत. तसेच, गौतम गंभीरने 147 एकदिवसीय सामन्यात 39.68 च्या सरासरीने 5 हजार 238 धावा केल्या आहेत. तर 37 टी -20 सामन्यांमध्ये 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत. गौतम गंभीरने विश्वचषक 2011मध्ये भारतीय संघासाठी 122 चेंडूंत 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 2011 वर्ल्ड कप जिंकला. मात्र गौतम गंभीरने 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.