मुंबई - एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांची ओळख अमेरिकेत अटक केलेल्या आयएसआय एजंट गुलाम नबी फई याने पाकिस्तानी आयएसआय जनरलशी करून दिली. भरती करून घेण्याचा उद्देशाने ही ओळख करून देण्यात आली होती. यावरून नवलखा यांचे पाकिस्तानी एजंटशी असलेले संबंध दिसून येतात, अशी माहिती एनआयएने नवलखांच्या नियमित जामीन अर्जाला विरोध करताना प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाला दिली.
सप्टेंबर, २०२२ मध्ये विशेष न्यायालयाने गौतम नवलखांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर एनआयएला उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. सोमवारच्या सुनावणीत एनआयएतर्फे ॲड. संदेश पाटील यांनी न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले. नवलखा यांनी काश्मीर फुटीरतावादी चळवळ आणि माओवादी चळवळीशी संबंधित मुद्द्यांवर वेगवेगळ्या मंचांवर आणि कार्यक्रमांवर भाषणे दिल्याचा दावा एनआयएने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. नवलखांकडून जप्त केलेली कागदपत्रे भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)च्या स्थापनेशी संबंधित ‘व्यूहात्मक दस्तऐवज’ आहेत. या कागदपत्रांवरून अर्जदाराचा पक्षाच्या क्रियाकलापांमध्ये खोल सहभाग असल्याचे दर्शवितात, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
आपली गुन्हेगारी कृत्ये लपविण्यासाठी नवलखा यांनी आपण मानवी हक्कांकरिता लढत असल्याचे चित्र रंगविले. नवलखा देशाविरुद्धच्या कारवायांना प्रोत्साहन देत होते. सरकारविरोधात बुद्धिजीवींना एकत्र करण्याचे काम त्यांना देण्यात आले होते, असा दावा एनआयएने केला आहे.