मुंबई - गे असल्याने आपल्याला बॉसने त्रासदायक वागणूक दिल्याचा आरोप टेक महिंद्रा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने केला आहे. गौरव प्रामाणिक असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने त्याची बॉस रिचा गौतम हिच्यावर हे आरोप केले आहेत. रिचा गौतम सध्या टेक महिंद्रामध्ये डायव्हर्सिटी विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहते. गौरवच्या आरोपांनंतर अजून एका माजी कर्मचाऱ्याने रिचा ही मुस्लीम धर्माविरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गौरवने या संदर्भात ट्विटरवर एक पत्र जाहीर केलं होतं. त्या पत्रात त्याने रिचाकडून झालेल्या छळाचा उल्लेख केला आहे. 2012पासून ते 2016पर्यंत गौरव महिंद्रामध्ये काम करत होता. त्यावेळी रिचा त्याच्या गे असण्यावरून आणि त्याच्या रंगीबेरंगी कपड्यांवरून जाहीरपणे टिंगलटवाळी करून गौरवला लज्जास्पद वागणूक देत असे. ती त्याचा उल्लेख बायक्या असा करत होती. ती तिच्या हाताखालच्या अनेकांना ती गौरवची टिंगल करण्यासाठी प्रात्साहन देत असल्याचा आरोप गौरवने या ट्विटमधील पत्रात केला आहे. या सगळ्याला वागणुकीला कंटाळून गौरवने 2016 मध्ये महिंद्रा कंपनीचा राजीनामा देत नोकरी सोडली. गौरवच्या या तक्रारीनंतर स्पंदन महंता या अजून एका कर्मचाऱ्याने रिचावर मुस्लीमांविरोधी वर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या प्रकरणाची दखल घेत आता एका त्रयस्थ अधिकाऱ्याद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. कारण डायव्हर्सिटी विभागासोबत रिचा महिंद्रा कंपनीच्या अन्य समितीमंडळांवरही असल्याने ही चौकशी निष्पक्षपातीपणे होण्यासाठी त्रयस्थ अधिकारी नेमण्यात येणार आहेत.