१८ महिन्यात ११ जणांची हत्या करणाऱ्या एका सीरियल किलरला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपी आधी लिफ्ट द्यायचा. त्यानंतर हत्या करायचा. इतकंच नाही तर तो मृतदेहासोबत शरीरसंबंधही ठेवायचा. शेवटी मृतदेहाच्या पायाला स्पर्श करून माफीही मागायचा. हे सगळं ऐकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.
पंजाबमध्ये रुपनगर पोलिसांनी या गे सीरियल किलरला अटक केली. या व्यक्तीने ज्यांची हत्या करून मृतदेहासोबत संबंध ठेवले, ते सगळे पुरुष होते.
वेगळ्याच प्रकरणात अटक, नंतर कळले सीरियल किलर
या सीरियल किलरचे नाव राम स्वरूप उर्फ सोढी असे असून, तो होशियारपूर जिल्ह्यातील चौरा गावाचा आहे. त्याला सोमवारी (२३ डिसेंबर २०२४) वेगळ्याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने ही माहिती दिली आणि तो सीरियल किलर असल्याचे समोर आले.
पोलिसांनी सांगितले की, तो कारमध्ये लिफ्ट देऊन त्यांना लुटायचा. त्याला विरोध केल्यास त्या व्यक्तीची हत्या करायचा.
रुपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलनीत सिंह खुराणा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील भयंकर गुन्ह्यांचा तपास करण्याचे निर्देश देण्यात आले होते. हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले होते.
कोणत्या प्रकरणात झाली होती अटक?
किरतपूर साहिब हत्या प्रकरणाचा उल्लेख करत खुराणा यांनी सांगितले की, १८ ऑगस्ट रोजी ३७ वर्षाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. हा व्यक्ती टोल नाक्यावर चहा आणि पानी देण्याचे काम करायचा. याच प्रकरणात रामस्वरूपला अटक करण्यात आली होती. चौकशी केल्यानंतर त्याने इतर हत्या प्रकरणाबद्दल खळबळजनक खुलासे केले.
दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने चौकशीत कबूल केले की, त्याने किरतपूर साहिब हत्या प्रकरणाबरोबरच इतर १० जणांच्या हत्या केल्या.
चौकशीत त्याने सांगितले की, आरोपी गळा दाबून किंवा दगडाने हत्या करायचा. सीरियल किलर हत्या केल्यानंतर मृतदेहाचे पाय धरायचा आणि माफी मागायचा. कारण त्याला हत्या केल्याचा पश्चाताप व्हायचा. आरोपी विवाहित असून, त्याला तीन मुलं आहेत. समलिंगी असल्याने त्याने दोन वर्षापूर्वी कुटुंबासोबत राहणे सोडून दिले होते.