नवी दिल्ली - बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गयामध्ये एका गोल्ड लोन कंपनीत (Gold Loan Company) दरोडा टाकून दरोडेखोरांनी दिवसाढवळया लाखो रुपये लुटून नेल्याची भयंकर घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारी चार दरोडेखोर बंदुकीचा धाक दाखवत आले आणि 2 किलो सोनं आणि तीन लाख 36 हजारांची रोख रक्कम लुटून नेली आहे. अवघ्या 12 मिनिटांत त्यांनी तब्बल 84 लाखांची लूट केली आहे. य़ाप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्रांचचे असिसटेंट हेड मनजीत कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. वजीरगंज बाजारात आशीर्वाद गोल्ड लोन (Ashirwad Gold Loan) संस्था आहे.
शाखेमध्ये चौकशी करण्याच्या बहाण्याने सुरुवातीला दोन जण आत आले. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे आणखी दोन साथीदार आत आले. त्यांनी अचानक खिशातून बंदूक काढून कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना एका कोपऱ्यात नेऊन उभं केलं. दरोडेखोरांनी संस्थेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडून लॉकरची किल्ली मागितली. ती किल्ली मिळाल्यानंतर त्यांनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र चुकीच्या पद्धतीने लॉकर उघडण्याचा प्रयत्न झाल्याने सायरन वाजायला सुरुवात झाली.
सायरन वाजल्याचं पाहून दरोडेखोरांनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न थांबवला आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा धमकावलं. तातडीने सायरन बंद केला नाही, तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अलार्म बंद केला. त्यानंतर दरोडेखोरांनी लॉकर उघडून त्यातून 2 किलो सोनं आणि 3 लाख रुपये लंपास केले. लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी बाईकवरून पळ काढला. दरोडेखोर दोन वेगवेगळ्या बाईकवरून वेगवेगळ्या दिशेला फरार झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! सिम व्हेरिफिकेशनसाठी 11 रुपये मागितले अन् खात्यातून 6 लाख गायब केले; असा घातला जातोय गंडा
सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हल्ली यामुळे होणाऱ्या फ्रॉडची संख्या देखील वाढली आहे. विविध मार्गांचा वापर करून हॅकर्स युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अनेक जण ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या रीवामध्ये सिम व्हेरिफेकशनच्या नावाने एका डॉक्टरची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. फक्त 11 रुपयांच्या नावाने एका डॉक्टरच्या खात्यातून फ्रॉड करणाऱ्यांनी तब्बल 6 लाखांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे. हा भयंकर प्रकार लक्षात येताच डॉक्टरने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.