प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील अँटिनिया या निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या २० काड्या, धमकीचे पत्र आणि ४ गाडीच्या नंबर प्लेट असलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली. गाडीत सापडलेल्या जिलेटिनच्या काड्या एका नागपूरच्या कंपनीच्या असल्याने या स्फोटकांचं नागपूर कनेक्शन समोर आलं आहे. त्यानुसार मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने संबंधित मालकाची चौकशी केली. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात भादंवि कलम २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० (ब) आणि एक्सप्लोसिव्ह सबस्टेन्स ऍक्ट १९०८ कलम ४अन्वये गुन्हा दाखल आहे.
जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती कड्यांवर असलेल्या कव्हरवरून मिळाली आहे. सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही जिलेटिनसारखी स्फोटकं प्रामुख्याने पुरविली जातात. सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी यासंबंधी मुंबई पोलिसांनी माहिती दिल्याचे सांगितले. आम्ही आतापर्यंत ज्या ज्या लोकांना जिलेटीन दिलंय, त्यांची माहिती आम्ही पोलिसांनी दिली आहे, असं कंपनीचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी सांगितलं. सोलर इंडस्ट्रीजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक ए के श्रीवास्तव यांनी सांगितले, पोलिसांनी आम्हाला प्रोडक्शन कसे केले जाते आणि ते उत्पादन कसे विकले जाती याबाबत विचारली आणि आम्ही त्यांना माहिती दिली आहे. जर आम्हाला जिलेटीन काड्यांच्या बॉक्सवरील बारकोड मिळाला तर त्या बद्दल सविस्तर माहिती आम्ही देऊ शकतो.
गुरूवारी मध्यरात्री १.३० वाजता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्हमध्ये तयार झाल्या आहेत, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली’, असे सत्यनारायण नुवाल यांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणी मुंबई पोलीस जलद गतीने तपासकार्य करताना दिसत आहेत. जर जिलेटीनच्या बॉक्सवर बारकोड असेल तर कुठल्या ठिकाणी आणि कोणाला ते जिलेटीन विकले हे समजण्याची शक्यता आहे.