मुंबई : आंतरराष्ट्रीय कॉल सीमबॉक्स प्रणालीचा वापर करीत मुंबई आणि भारताबाहेर जनरेट करणाऱ्या टोळीचा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ६ आणि ११ ने शनिवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी समीर अलवारी (३८) याला गोवंडीतून अटक केली. अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
अधिक क्षमतेच्या इंटरनेटचा वापर करीत अनधिकृत आंतरराष्ट्रीय व्हॉईस कॉल्स सीमबॉक्समध्ये बसविलेल्या सीमचा वापर करून ते भारतातील स्थानिक नेटवर्कला जोडून त्याला डोमेस्टिक कॉल दाखविण्यात येत होते. हे कॉल सुरक्षा यंत्रणांच्या नियंत्रणात नसल्याने त्यांचा वापर देशात घातपाती कारवाईसाठी केला जाऊ शकतो, अशी माहिती क्राइम ब्रँचला मिलिटरी इंटेलिजन्सने दिली.
यात एका मोबाइल कंपनीचे दोन क्रमांक प्रीपेड कनेक्शनमध्ये असून मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये ते अॅक्टिव्ह असल्याची माहिती यंत्रणेला मिळाली. कक्ष ११ चे साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या गुप्त बातमीदाराने गोवंडीतील पत्ता दिला. झिने, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल चौगुले, महेंद्र घाग, खासगी तांत्रिक तज्ज्ञांचे पथक तेथे गेले. छापा टाकून अलवारीला ताब्यात घेतले. झडतील लाकडी बॉक्समध्ये ५ सीम बॉक्सचे सेटअप करून त्यामार्फत तो समांतर टेलिकॉम आॅपरेशन चालवत असल्याचे उघड झाले.आखाती देश आणि नेपाळमध्येही या टोळीचे काही कनेक्शन आहे का? याबाबत अलवारीकडे चौकशी सुरू आहे.