ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्याथ्र्याना सकस आहारापोटी दिल्या जाणाऱ्या चिक्क्यांमध्ये ळया आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चिक्यांचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याची सर्व देयके थांबविण्याची मागणी ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेसने केली.
ठाण्यात महापालिकेच्या २०० हून अधिक शाळा आहेत. या शाळांमधील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांना सकस आहारापोटी दररोज चिक्या दिला जात होत्या. कोविड कालावधीत शाळा बंद असल्याने त्याचा पुरवठा बंद झाला होता. यावेळी राजकीय हस्तक्षेप करून या चिक्यांचा आठवडय़ातून एकदा पुरवठा करण्याचा निर्णय ठाणो महापालिकेच्या शिक्षण मंडळाने सुधारीत निर्णयाने घेतला. वास्तविक, याबाबत बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अॅड. विक्रांत चव्हाण यांनीही याबाबत विषय घेतला होता. हा ठेका बेकायदेशीररीत्या दिला असून अटीशर्तीनुसार दिलेला नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. हा कारखाना देखिल ठाण्याऐवजी सोलापूरमध्ये आहे. ठाण्यातील एका अनधिकृत बंगल्यावर या चिक्क्यांचा सर्व साठा ठेवण्यात येतो. याठीकाणी स्वच्छतेबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शहर कॉग्रेसचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी केला आहे. या ठेकेदाराला ठीकठिकाणच्या शाळेतील विद्याथ्र्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवास शुल्क दिले जात आहे. तेही बेकायदेशीर असल्याची बाबही समोर आली आहे. या चिक्क्यामध्ये आता चक्क आळया आढळल्या आहेत. याबाबत आयुक्तांची भेट घेऊन या ठेकेदारावर त्वरीत गुन्हा दाखल करावा आणि त्याची देयके त्वरित रोखण्याची मागणी करणार असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.