मुंबई - घाटकोपर येथील विमान दुर्घटनेत विमानाच्या सहवैमानिक कॅप्टन मारिया झुबेरी यांचे पती प्रभात कथुरिया यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात अखेर आज गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा यु. वाय. एव्हिएशन कंपनीचे दीपक कोठारी, अनिल चौहान, विनोद साई आणि इतर संबंधित अधिकारी, स्पेअर पार्ट पुरविणारा सप्लायर अजय अग्रवाल, इंदमार एव्हिएशन कंपनीचे राजीव गुप्ता, अविनाश भारती यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात नोंदविण्यात आला आहे. भा. दं. वि. कलम ३०४ (२), ३३६, ३३७, ३४ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२८ जून २०१८ रोजी यु. वाय. एव्हिएशन या खासगी विमान कंपनीचे विमान घाटकोपरमधील जीवदया गल्लीत कोसळून वैमानिकासह चार व्यक्ती व एक पादचारी अशा ५ जणांचा मृत्यु झाला होता. किंग एअर सी ९० या प्रकारातील १२ आसनी या विमानाची देखरेख व दुरुस्ती करणाऱ्या इंदमार या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप कॅप्टन मारिया झुबेरी यांचे पती प्रभात कथुरिया यांनी केला होता. बेजबाबदारपणा कारणीभूत अपघातील विमानाची देखरेख हीच कंपनी करत होती त्यामुळे कंपनीच्या निष्काळजीपणाचा फटका बसल्याच्या आरोपाला पुष्टी मिळाल्याचे कथुरिया म्हणाले. कंपनीच्या बेजबाबदार कामावर यामुळे शिक्कामोर्तब झाल्याचे ते म्हणाले.
घाटकोपरविमान दुर्घटनेप्रकरणी कंपनीविरोधात कारवाई करावी, यासाठी मृत कर्मचाऱ्यांच्या नातलगांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. नातेवाईकांनी लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. विमान दुर्घटना घाटकोपर परिसरात घडल्यामुळे तक्रार अर्ज घाटकोपर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार आज हा गुन्हा दाखल करून घेण्यात आला.