मुंबई - घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्याकांडप्रकरणी पंतनगर पोलिसांनी आज आणखी एकास अटक केली. सिद्धेश शंकर पाटील (वय 23) असे अटक आरोपीचे नाव असून उदानीला ज्या तिघांनी मारहाण केली, त्या कटात पाटीलचाही सहभाग होता. याप्रकरणी अटक आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे. पाटीलला पंतनगर पोलिसांनी डोंगरी येथून अटक केली आहे. उदानी हत्याकांडप्रकरणी यापूर्वी निखत खान उर्फ झारा खान (वय 20), शाईस्ता खान ऊर्फ डॉली (वय 41)आणि महेश भोईर (वय 31), सचिन पवार, पोलिस दिनेश पवार आणि चालक प्रणीत भोईर या सहा जणांना अटक झाली आहे. हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांची हत्या न करता त्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांचा अश्लील व्हिडीओ बनवून त्या मार्फत उदानी यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा कट सचिन आणि दिनेश यांचा होता. या दोघांनी मिळून हा कट महिन्याभरापूर्वी शिजवला होता.त्याची जबाबदारी दिनेश यांच्यावर सोपविण्यात आली होती, मोबदल्यात त्याला मोठी रक्कम मिळणार होती. उदानीला हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी शाहिस्ता खान मध्यस्थीने निखत खानचा वापर करण्यात येणार होता. या बदल्यात निखतला हिंदी मालिकेत भूमिका देण्याचे कबूल करण्यात आले होते अशी माहिती उघडकीस येत आहे. मात्र या कटाचा हनीट्रॅप वाटेतच फसला. त्यानंतर दिनेश पवार, महेश भोईर व सिद्धेश पाटील यांनी उदानीला मारहाण केली. उदानीसोबत झालेल्या झटापटीत उदानी यांची हत्या झाली.
पनवेलचा महेश प्रभाकर भोईर, बारबाला निखत ऊर्फ झारा मोहम्मद खान हिच्यासह सायीस्ता सरवर खान ऊर्फ डॉली यांना मंगळवारी अटक करण्यात आली. झारा ही डॉलीच्या मामाची मुलगी आहे. डॉलीच्या सांगण्यावरुन झारा ही सचिनच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. उदानी यांच्या अपहरणाआधी मुख्य आरोपी सचिन पवार याने विक्रोळीच्या टागोरनगर येथे आरोपींची भेट घेतली होती. तेथून तो राजकीय पक्षाच्या बैठकीला निघून गेला.अपहरणासाठी वापरलेल्या कारमध्ये झारा आणि प्रणीत भोईर होता. पुढे घणसोली परिसरात दिनेश हा महेश आणि अन्य साथीदारांसह कारमध्ये चढले. त्यांनी उदानी यांची हत्या केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणातील दिनेश आणि प्रणितला कोठडीसाठी मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दिनेशने पोलिसांनी मारहाण केल्याचे नाटक केले. मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याने दोघांनाही १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कपड्यांचाही शोध घेणे बाकी असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.